काश्मीर धगधगले

0
89

काश्मीर धगधगते आहे. खोर्‍यातील सर्व दहा जिल्ह्यांत संचारबंदी आहे, तरीही किमान चार पोलीस स्थानके आणि चाळीसहून अधिक सरकारी कचेर्‍या जाळल्या गेल्या. हिंसाचार आणि बळींची संख्या वाढतच आहे. निमित्त झाले आहे ते बुरहान वानी या स्थानिक दहशतवाद्याच्या मृत्यूचे. सुरक्षा दलांनी हिजबुल मुजाहिद्दीनच्या या सक्रिय तरूण कमांडरचा खात्मा केला आणि त्याच्या मृत्यूला ‘हौतात्म्या’ चा रंग देत भारतविरोधी शक्तींनी अवघे काश्मीर पेटवले आहे. एका अत्यंत गंभीर वळणावर काश्मीर प्रश्न आज येऊन ठेपला आहे. दहशतवाद आणि हिंसाचार काश्मीरला नवा नाही, परंतु यावेळची हिंसा वेगळी आहे. तिचे लोण घराघरांत पसरत चालले आहे. फुटिरतावाद्यांच्या स्थानिक सहानुभूतीदारांची संख्या सतत वाढते आहे. लष्कराने एवढ्या वर्षांत सौहार्दाचे वातावरण तयार करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले आहे. आजच्या परिस्थितीला सामोरे जाण्यात तेथील पीडीपी – भाजपचे सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे तर दिसते आहेच, परंतु काश्मिरी जनतेचा विश्वास संपादन करण्यातही त्या सरकारला पूर्ण अपयश आलेले आहे. ज्या उत्साहाने काश्मिरी जनतेने गेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान केले होते, त्यांचा भ्रमनिरास होऊ लागला आहे असेच एकंदर चित्र आहे. काश्मीरमधील नव्या पिढीतील फुटिरतावाद्यांना बुरहानच्या मृत्यूने आपल्या भारतविरोधी कारवायांसाठी फार मोठी संधी मिळवून दिली. बुरहान हा २२ वर्षांचा तरूण, अत्यंत कडवा दहशतवादी. वयाच्या पंधराव्या वर्षापासून तो दहशतवादाच्या मार्गावर उतरल्याचे सांगतात. फेसबुक आणि व्हॉटस्‌ऍपवरून सातत्याने भारतविरोधी गरळ ओकत त्याने स्थानिक काश्मिरी तरुणांना आकृष्ट केले आणि दहशतवादाचा मार्ग दाखवला. पूर्वी काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये मुख्यत्वे सीमेपलीकडून घुसखोरी करून येणार्‍या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा समावेश असे. स्थानिक फुटिरतावाद्यांचा सहभाग भारतविरोधी घोषणाबाजी करणे वा लष्करावर दगडफेक करण्यापुरताच मर्यादित असे. परंतु अलीकडे हे चित्र पालटले. सशस्त्र काश्मिरी तरुणांच्या तुकड्या खोर्‍यातच दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेताना दिसू लागल्या. बुरहानसारख्या देशद्रोह्यांची ही कामगिरी होती. गेल्या तीन वर्षांमध्ये स्थानिक काश्मिरी तरूण दहशतवादाकडे ओढले जाण्याचे प्रमाण वाढत चालले आहे आणि लष्करासाठीही हा अनुभव नवा आहे. काश्मीरसाठी ही विलक्षण चिंतेची बाब आहे. विशेषतः तरुणांमध्ये हे विष भिनत चालले आहे. जुन्या फुटिरतावादी नेत्यांना जुमानायलाही हे तरूण तयार नाहीत. सध्या सय्यद अली शाह गिलानीसारख्या बुजूर्ग नेत्याने हिंसाचार न करण्याचे आवाहन करूनही काश्मिरी तरूण ऐकताना दिसत नाही. हा नव्या स्वरूपाचा दहशतवाद आहे आणि तो अत्यंत घातक रूप धारण करीत चालला आहे. अबु कासीम किंवा बुरहानसारख्याच्या अंत्यसंस्कारांना लोटलेली काश्मिरी तरुणांची प्रचंड गर्दी परिस्थितीची कल्पना येण्यास पुरेशी आहे. या परिस्थितीत ज्यांंनी काश्मिरी तरूणांना भरकटल्या मार्गावरून मुख्य प्रवाहात आणायचे ते स्थानिक राजकारणी अत्यंत लाजिरवाणी बोटचेपी भूमिका घेऊन आपल्या हतबलतेचेच प्रदर्शन करीत आहेत ही दुर्दैवाची बाब आहे. विशेषतः बुरहानच्या खात्म्यानंतर उमर अब्दुल्लांच्या ट्वीटरवरील प्रतिक्रिया पाहा. बुरहानने सोशल मीडियावरून जेवढ्या तरुणांची भरती केली असती, त्याहून अधिक तो आता त्याच्या कबरीतून करील असे उमर म्हणाले. उमर अब्दुल्लांसारख्यांनी ही हतबलता दर्शवावी आणि शरणागतीचा पवित्रा दाखवावा यावरून बुरहानच्या मृत्यूचा खुद्द काश्मिरी नेत्यांनी किती धसका घेतला आहे हे लक्षात यावे. यातून अर्थातच फुटिरतावाद्यांचे मनोबल वाढणार आहे. काश्मिरी तरुणांमध्ये भारतविरोधी विष आता भिनत चालले आहे आणि केवळ पाकिस्तानची आयएसआयच नव्हे, तर अगदी आयएसआयएसदेखील त्यांचा उपयोग करून घेण्यासाठी उत्सुक आहे. आधीच स्वतःच्या काश्मिरी अस्मितेच्या ‘कश्मिरियत’च्या संकल्पनेने भारलेली काश्मिरी तरुणांची मने ‘काश्मिरी खिलाफत’ च्या कल्पनेने भारली जाऊ लागली तर नवल नाही. सरकारने आणि नेत्यांनी केवळ मूक साक्षीदार होऊन चालणार नाही. पसरत चाललेल्या या विषवल्लीच्या मुळांना तर ठेचावे लागेलच, पण त्याआधी काश्मिरी जनतेचा, विशेषतः तरुणाईचा घटत चाललेला विश्वास आणि पालटत चाललेली त्यांची मने यावर उपाययोजना कराव्या लागतील. ठिणग्यांचे वणवे होत असताना ठामपणे उभे राहणार्‍या नेत्यांचीच आज काश्मीरमध्ये वानवा आहे.