काश्मीर खोर्‍यात पुराचे थैमान : हजारो बेघर; १०० मृत्यूमुखी

0
102
काश्मीरात महाभयंकर पुरामुळे सुमारे ४०० गाव पाण्याखाली गेले आहेत.

काश्मीर खोर्‍यात सलग पाचव्या दिवशी मुसळधार पावसामुळे पुराने आणखी भयावह रूप धारण केले केल्याने स्थिती गंभीर बनली आहे. पुरात आतापर्यंत मृतांचा आकडा १०० झाला आहे. हजारो लोकांना घरे सोडून सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे भाग पडले आहे.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाहणीसाठी राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. काल गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांसमवेत पाहणी केली. गेल्या साठ वर्षांत प्रथमच निर्माण झालेल्या पूरस्थितीत सुमारे ४०० गावे पुरामुळे प्रभावित झाली आहेत. लष्कर, पोलीस, राष्ट्रीय आपत्कालीन फौज स्थानिकांना बचावासाठी मदत करीत आहे. अनेक लोक मालमत्तेच्या भयापोटी घरे सोडून जाण्यास तयार नसल्यामुळे पोलिसांसमोर त्यांच्या बचावाचे संकट आहे. स्थलांतर केलेल्यांनी श्रीनगर तसेच दक्षिण काश्मीरच्या फुलवामा व अनंतनाग जिल्ह्यातील शाळा, मशिदी तसेच रेल्वे स्थानकांवर आश्रय घेतला आहे. सरकारने त्यांच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी सरकारने सामूहिक स्वयंपाक केंद्रे उघडली आहेत.
राज्यातील दळणवळण यंत्रणा कोलमडली असून वाहतूकही अडकून पडली आहे. वैष्णोदेवी यात्राही काल थांबवण्यात आली. अडकून पडलेल्यांना आजपासून हॅलिकॉप्टरद्वारे सुरक्षित स्थळी हलविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले.
दरम्यान, वेधशाळेने आणखी काही दिवस पाऊस चालू राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.