काश्मीरी पंडित पीओके निर्वासित राहुल गांधींचे उद्गार, भाजपची टीका

0
4

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी राज्यात प्रचार करत असताना त्यांनी, काश्मिरी पंडितांना पीओके निर्वासित म्हटले. काल बुधवारी जम्मू जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ आयोजित निवडणूक रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी गांधी यांनी, ईडी, सीबीआय आयटी अशा केंद्रीय एजन्सीचा वापर केल्याचा आरोप केला. त्यावेळी भाषण करताना राहुल गांधींनी काश्मिरी पंडितांना पीएओके निर्वासित म्हटले. मात्र, नंतर त्यांची चूक लक्षात आल्याने त्यांनी आपले विधान दुरुस्त केले. मात्र त्यावरून भाजपने राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे.

जम्मू-काश्मीरच्या सर्व जनतेला राज्याचा दर्जा बहाल करावा. पण केंद्र सरकारने तसे केले नाही.पण निवडणूक झाल्यानंतर जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करावा लागेल. त्यांनी तसे केले नाही, तर केंद्रात आमचे सरकार स्थापन होताच आम्ही जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करू, असे राहुल म्हणाले. यादरम्यान राहुल यांनी मनमोहन सिंग यांनी पीओकेमधून आलेल्या निर्वासितांना दिलेले वचन पूर्ण केले जाईल असे सांगितले. मात्र चूक लक्षात आल्यावर त्यांनी, मनमोहन सिंग यांनी काश्मिरी पंडितांना दिलेले वचन पूर्ण केले जाईल असे सांगितले.
मात्र भाजपने हा माणूस पीओकेमधील निर्वासित आणि काश्मिरी पंडित यांच्यात फरक करू शकत नाही आणि स्वतःला गांभीर्याने घेण्याची अपेक्षा करत असल्याची टीका केली आहे.