काश्मीरप्रश्‍नी संयुक्त राष्ट्रसंघाच्या  हस्तक्षेपाची पाकची मागणी

0
106

काश्मीरात भारत – पाकिस्तानदरम्यानच्या नियंत्रण रेषेवरील व आंतरराष्ट्रीय सिमेवरील स्थितीबाबत पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रसंघाच्या अध्यक्षांकडे चिंता व्यक्त केली असून याप्रश्‍नी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार सरताज अझीझ यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे अध्यक्ष बन की मून यांना पत्र लिहिले असून यात गेले काही आठवडे भारत शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे सिमेवरील सुरक्षा स्थिती गंभीर बनल्याचे पाकिस्ताने म्हटले आहे. जम्मू काश्मीरचा विषय संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेकडे गेली अनेक वर्षे आहे. त्यावर तोडगा म्हणून काश्मीरात सार्वमत घेतले जायला हवे अशी आठवण पाकिस्तानने करून दिली आहे. काश्मीरातील लोकांच्या भल्यासाठी या भागाच्या शांतीसाठी तोच एक अखेरचा उपाय असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.
ऑगस्ट २०१४मधील भारत-पाक दरम्यानची विदेश सचिव स्तरावरील बोलणी भारताने परस्पर कोणतेही कारण नसताना रद्द केली असा आरोपही पत्रात आहे. (दरम्यान, पाकिस्तानने बोलण्यांअगोदर काश्मीरातील फुटीरतावादी नेत्यांशी चर्चा केल्यामुळे भारताने ही बोलणी रद्द केली होती.)
पाकिस्तानकडून १५ चौक्या, गाव लक्ष्य
जम्मू जिल्ह्यात पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमेवरील सीमा सुरक्षा दलाच्या १५ चौक्यांना लक्ष्य केले. तसेच भारताच्या हद्दीतील गावांच्याबाजूनेही गोळीबार व रॉकेटचा मारा करण्यात आला. यात तिघे जण जखमी झाले आहेत. सीमा सुरक्षा दलानेही चोख प्रत्युत्तर दिले. त्याआधी परवा रात्री पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन करताना जोरदार गोळीबार केला. दरम्यान, सीमेनजीकच्या सततच्या गोळीबारामुळे भारतीय हद्दीतील सुमारे ३२ हजार लोकांनी भीतीने पलायन केले असून १३५ गाव ओसाड पडले आहेत.