पाकिस्तानचा हेका कायम
यापुढेही काश्मीर फुटीरतावाद्यांशी बोलणी चालू ठेवणार असल्याचे पाकिस्तानने स्पष्ट केले. काश्मीरविषयक भारत-पाकिस्तान बोलण्यांमध्ये सर्व घटकांना सामावून घेणे ही पहिली आवश्यकता आहे. फुटीरतावादी काश्मीरच्या मुद्द्यात महत्त्वाचा घटक असल्याचे पाकिस्तानी उच्चायुक्तांनी सांगितले. भारताने पाकिस्तानच्या या पवित्र्यास तीव्र आक्षेप घेत पाकिस्तान शिमला कराराने घालून दिलेल्या अटींच्या विपरित वागत असल्याचे सांगितले.
भारताने विरोध करूनही पाकिस्तानने काश्मीरी फुटीरतावादी नेत्यांशी चर्चा केली. काल त्याचे पाकिस्तानी उच्चायुक्त बसीत यांनी समर्थन केले. फुटीरतावाद्यांशी चर्चेमुळे भारताने पाकिस्तानबरोबरची विदेश सचिव स्तरावरील बोलणी रद्द केली होती.
फक्त दोनच दावेदार : भारत
१९७२ च्या सिमला करारानुसार काश्मीरप्रश्नात केवळ दोनच दावेदार आहेत, ते म्हणजे भारत आणि पाकिस्तान असे भारतीय परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले. १९९९ च्या वाजपेयी – नवाज शरीफदरम्यानच्या लाहोर जाहीरनाम्याचीही हीच प्रमुख अट होती याची आठवणही भारताने करून दिली आहे.
काश्मीरी लोकांचे मत महत्त्वाचे : हुरियत
श्रीनगर : काश्मीरप्रश्नी भारत व पाकिस्तान हे दोनच दावेदार नाहीत, काश्मीरच्या लोकांचे मत यात महत्त्वाचे आहे, असे हुरीयत कॉन्फरन्सच्या मवाळ गटाचे नेते मिरवीझ उमर फारुख यांनी सांगितले. काश्मीरप्रश्नी भारत – पाकिस्तानपेक्षा काश्मीरी लोकांचे मत महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.