>> पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण; ३३९ कोटींचा खर्च; काशी विश्वेश्वराची मोदींकडून पूजा
वाराणसीच्या दौर्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल काशी विश्वेश्वराची पूजा केली आणि त्यानंतर श्री काशी विश्वनाथ धामचे (कॉरिडोर) लोकार्पण केले. श्री काशी विश्वनाथ कॉरिडोरच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून, त्यासाठी ३३९ कोटी रुपये इतका खर्च आला आहे. २ वर्षे आणि ९ महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे थेट प्रसारण देशातील अनेक ठिकाणी करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी काशी विश्वनाथ कॉरिडोरसाठी काम करणार्या मजुरांचा गौरव केला. यावेळी पंतप्रधान मोदींनी जनतेशी संवाद साधला. हर हर महादेव म्हणत मोदींनी भाषणाला सुरुवात केली. यावेळी काशी विश्वनाथ कॉरिडोरसाठी जागा देणार्या काशीतील जनतेचे, उत्तर प्रदेश सरकारचे मोदींनी अभिनंदन केले.
पवित्र गंगा नदी काठावर भारताची भव्य संस्कृती वसली आहे. काशी विश्वनाथ मंदिराचा परिसर पूर्वी खूप छोटा होता; पण आता काशीतील जनतेच्या पुढाकाराने आता हजारो भाविक थेट गंगा स्नान करून काशी विश्वनाथाचे दर्शन घेऊ शकतील. दिव्यांग व्यक्तींनाही काशी विश्वनाथाचे दर्शन घेणे सुलभ होणार आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
भारताची भूमी ही शूरवीरांची : मोदी
भारताची भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या शूर योद्ध्यांची आहे. औरंगजेबाच्या दहशतीचा इतिहास साक्षीदार आहे. त्याने भारतीय संस्कृती आपल्या तलवारीच्या बळावर बदलण्याचा प्रयत्न केला. कट्टरतेने संस्कृती चिरडण्याचा प्रयत्न केला; पण या देशाची माती जगापेक्षा वेगळी आहे. याच महान भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शूर आणि पराक्रमी राजे निर्माण झाले आणि त्यांनी औरंगजेबासारख्यांचे मनसुबे उधळून लावले, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढले.