काशी की कॅसिनो?

0
4

आपल्या वाट्याला आलेल्या खात्याला न्याय देण्यासाठी धडपडणारे जे मंत्री आहेत, त्यामध्ये रोहन खंवटे यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. राज्याचे माहिती तंत्रज्ञान व पर्यटनमंत्री असलेल्या खंवटेंनी गोव्याच्या पर्यटनक्षेत्राला ऊर्जितावस्था देण्याच्या दिशेने जोरदार प्रयत्न चालवले आहेत. कोरोनाकाळात बंद पडलेले गोव्याचे पर्यटन पुन्हा गतिमान झाले आहे खरे, परंतु ते कोरोनापूर्व काळाएवढे तेजीत आलेले नाही असे जे चित्र जनतेसमोर आहे, ते कसे चुकीचे आहे आणि राज्याच्या पर्यटनाची कशी वेगवान वाटचाल सुरू आहे हे सांगण्यासाठी नुकताच त्यांनी राज्यातील संपादकांशी वार्तालाप साधला. एकीकडे गोव्याच्या पर्यटनाविरुद्ध समाजमाध्यमावरील इन्फ्ल्युएन्सर्समार्फत विशिष्ट घटकांकडून चाललेला विषारी प्रचार, दुसरीकडे गोव्याच्या पर्यटनक्षेत्राला बदनाम करणाऱ्या अलीकडच्या काळात सातत्याने घडणाऱ्या घटना ह्या दोन्हींमुळे पर्यटक गोव्याकडे पाठ फिरवतील की काय अशी भीती आज निर्माण झालेली आहे. गोव्याचे आकर्षण असलेला येथील निसर्ग तर वाढत्या शहरीकरणाच्या कचाट्यात सापडला आहे. अशा परिस्थितीत येथील पर्यटनाच्या नव्या दिशा शोधल्याशिवाय सरकारपुढे पर्याय नाही. खाणबंदीनंतर तर पर्यटन हाच राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनला आहे. यापूर्वी किनारपट्टीवरील पर्यटनाचा ताण अंतर्भागाकडे वळविण्याच्या घोषणा अनेक वर्षे होत आल्या. प्रत्यक्षात त्या आघाडीवर फारच कमी काम झाले. एकेक पर्यटनमंत्री सत्तेत येतो तेव्हा परिषद पर्यटनापासून वैद्यकीय पर्यटनापर्यंत अनेक कल्पना मांडत असतो. परंतु त्या प्रत्यक्षात उतरताना दिसत नाहीत. वर्षा पर्यटनाच्या घोषणाही अशाच हवेत विरल्या. आता कुठे पर्यटकांसाठी घरगुती निवास योजना आकाराला येते आहे. वनक्षेत्रामध्ये पर्यावरणपूरक पर्यटनाचा विचार पुढे येतो आहे. परंतु खरे तर हे खूप पूर्वीच व्हायला हवे होते. खंवटे यांनी पर्यटनमंत्री म्हणून गोव्याला ‘शाश्वत पर्यटन’ ह्या संकल्पनेकडून ‘पुनरुत्पादनक्षम पर्यटनाकडे’ नेण्याचा विचार उचलून धरला आहे. अर्थात, हे केवळ शब्दांचे खेळ आहेत. प्रत्यक्षात पर्यटकांची वाढती संख्या, त्यांचा रस्ता वाहतुकीसारख्या साधनसुविधांवर येणारा प्रचंड ताण, स्थानिकांना होणारा उपद्रव ह्या गोष्टींकडे, पर्यटकांच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष पुरवण्याची आवश्यकता आहे. ज्या तऱ्हेने पर्यटन दलाल, टॅक्सीचालक, शॅक्सचालक पर्यटकांशी गोव्यात मुजोरीने वागतात त्याविरुद्ध धडक कारवाई आवश्यक आहे. विद्यमान पर्यटनमंत्र्यांनी निश्चितपणे त्यासाठी प्रयत्न चालवले आहेत, परंतु त्यांना गृहखात्याची साथही गरजेची आहे. पर्यटन खात्याने उत्तर गोव्यात वाटप केलेल्या 206 शॅक्सपैकी 109 म्हणजे तब्बल 53 टक्के शॅक्स जर दुसऱ्याला चालवायला दिले जात असतील, तर ही अतिशय गंभीर बाब आहे. अशा शॅक्सचालकांचे शॅक्स तात्काळ जमीनदोस्त करून, त्यांना जबर दंड ठोठावून कायमचे काळ्या यादीत टाकले गेले पाहिजेत. पर्यटनमंत्र्यांनी आपल्या संकल्पनेतून साकारणार असलेल्या ‘एकादश तीर्थ’ योजनेची आणि ‘टाऊन स्क्वेअर’संकल्पनेचीही माहिती वार्तालापादरम्यान दिली. ‘एकादश तीर्थ’ योजनेखाली राज्यातील अकरा मंदिरांची यात्रा पर्यटकांना घडवली जाणार आहे आणि नार्वे येथे घाट बांधून तेथे गंगा आरतीच्या धर्तीवर मांडवीची आरती केली जाणार आहे असेही मंत्रिमहोदय म्हणाले. उत्तराखंडमध्ये ‘उत्तर काशी’ आहे, तशी गोवा ही ‘दक्षिण काशी’ बनविण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला असला, तरी एकीकडे मद्याचा महापूर, मसाज पार्लर आणि कॅसिनोंचा सुळसुळाट आणि दुसरीकडे मात्र गोव्याला ‘दक्षिण काशी’ म्हणायचे ह्यात अगदी हास्यास्पद विसंगती आहे. एखादे राज्य एखादी संकल्पना घेऊन पुढे जाते, तेव्हा त्यामध्ये सातत्य असावे लागते. उत्तर प्रदेशने महाकुंभच्या महापर्वणीचा पर्यटनदृष्ट्या असा काही प्रचारधडाका सध्या चालवला आहे की विस्मयचकित व्हावे. परंतु त्यात सातत्य दिसते. गोव्यात एकीकडे तुम्ही वर्षानुवर्षे कॅसिनो, मद्य, मसाज पार्लर, जुगार ह्याला चालना देणार आणि दुसरीकडे धार्मिक, आध्यात्मिक पर्यटनाची बात करणार! गोव्यात पर्यटक उतरतो तेव्हा विमानतळावरच्या ट्रॉलीपासून रस्त्यावरील दिव्याच्या खांबांपर्यंत आणि रस्त्याकडेच्या होर्डिंगपासून ट्रॅफिक पोलिसांच्या बॅरिकेडस्‌‍पर्यंत केवळ आणि केवळ कॅसिनोंच्या जाहिराती दिसतात. येथे येणारे पर्यटक ‘एकादश तीर्थ’ नव्हे, केवळ बारमधले ‘तीर्थ’ प्यायला येतात, कारण त्यांना आजवर गोव्याची तीच ओळख दाखवली गेली आहे. पू. तपोभूमी पीठाधीश मागे गोव्याचे थायलंड बनत चालले आहे असे म्हणाले होते ते काही खोटे नाही. त्यामुळे गोव्याच्या पर्यटनाची एक निश्चित दिशा आधी ठरवावी. कॅसिनो आणि काशी काही एकत्र नांदू शकणार नाहीत.