काळ्याचे पांढरे

0
105

सरकारच्या नोटबंदीची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसलेली असताना बडे राजकारणी, उद्योगपती आणि उच्चपदस्थ मात्र आपला कोट्यवधींचा काळा पैसा बिनदिक्कत पांढरा करण्यात मश्गूल असल्याची अनेक प्रकरणे उजेडात येऊ लागली असल्याने या नोटबंदीमुळे काळ्या पैशाला लगाम बसेल ही अपेक्षा भोळेपणाची ठरू लागली आहे. कुंपणानेच शेत खावे त्या प्रमाणे अनेक बँक अधिकार्‍यांनीही दलाली घेऊन काळ्याचे पांढरे करून दिल्याचेही उघडकीस आले आहे. ८ नोव्हेंबरच्या मोदींच्या नोटबंदीच्या घोषणेनंतर सर्व बँकांचे आर्थिक व्यवहार बारकाईने तपासले तर अशी आणखी अनेक प्रकरणे उजेडात येऊ शकतील. विशेष म्हणजे आजवर जे पकडले गेले त्यामध्ये काळ्या पैशाविरुद्ध लढण्याची बात करणार्‍या भारतीय जनता पक्षाशी संबंधित व्यक्तीही सापडल्या आहेत. कर्नाटकचे माजी मंत्री आणि बेळ्ळारीचे बादशहा जनार्दन रेड्डी यांनी आपल्या ब्राह्मणी या मुलीचे लग्न दणक्यात आणि पाचशे कोटींचा चुराडा करून केल्याने चर्चेत होतेच. आता या रेड्डींनी आपले शंभर कोटी एका सरकारी अधिकार्‍याच्या मदतीने काळ्याचे पांढरे केल्याचा व त्याची माहिती आपल्याला असल्याने आपला छळ झाल्याचा आरोप करीत एका चालकाने आत्महत्या केली आहे. आरोप अतिशय गंभीर आहे आणि त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. सदर अधिकारी आणि रेड्डी यांच्यात दोन पंचतारांकित हॉटेलांत अनेक भेटी झाल्याचे त्या चालकाने चिठ्ठीत म्हटले आहे. या अधिकार्‍याची योग्य प्रकारे चौकशी झाली आणि त्या दोन्ही ठिकाणांवरील सीसीटीव्ही तपासले तर सत्य काय हे सहजतः उजेडात येऊ शकते. दोन कारगाड्यांचा पैशांच्या अदलाबदलीसाठी वापर झाला आणि जुन्या नोटांच्या बदलात पन्नास आणि शंभरच्या नोटा देण्यात आल्या असे या चालकाचे म्हणणे आहे. असा प्रकार इतर अनेकांकडून झालेला असू शकतो. पश्‍चिम बंगालमध्ये एका भाजपा नेत्याला ३१ लाखांच्या नव्या नोटांसह पकडण्यात आले आहे. तामीळनाडूत एक भाजयुमो नेता लाखोंच्या नव्या नोटांसह पकडला गेला होता. रेड्डींच्या कन्येच्या लग्नाला भाजपा नेते बी. एस. येडीयुराप्पा गेले होते आणि एकेकाळी याच रेड्डी बंधूंना सुषमा स्वराजांनी राम – लक्ष्मण म्हणत गौरविले होते हे सर्वविदित आहेच. बेंगलुरूमध्ये अलीकडेच दोघा सरकारी अभियंत्यांपाशी नव्या चलनातील कोट्यवधी रुपये सापडले होते. ते त्यांच्याकडे कुठून आणि कसे आले आणि ते नेमके कोणाचे होते? उजेडात येणार्‍या प्रकरणांतून असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. नोटबंदीने सामान्य माणसाला त्याचा कष्टाचा पैसा मिळवणे मुश्कील झालेले असताना या सर्व महाभागांना कोट्यवधींच्या नव्या दोन हजारांच्या नोटा मिळतात कशा? बँक अधिकार्‍यांपासून वरिष्ठ सरकारी अधिकार्‍यांपर्यंत आणि सुवर्णकारांपासून सीएंपर्यंत दलालीच्या मोबदल्यात काळ्याचे पांढरे करण्यास पुढे सरसावणार्‍यांच्या या फौजा पाहिल्या तर नोटबंदीच्या यशाविषयी साशंकता वाटतेे. नाना प्रकारच्या क्लृप्त्या त्यासाठी वापरल्या गेल्या. अगदी जनधन खात्यांचाही गैरवापर झाल्याचे दिसून आले. ईशान्येकडील राज्यांतील आदिवासींना आयकर कायद्यात असलेल्या सवलतींचा गैरवापर करण्यापर्यंत काहींची मजल गेली. या सगळ्या कहाण्या व्यथित करणार्‍या आहेत. ज्या देशभक्तीच्या भावनेने नागरिकांनी नोटबंदीचे कष्ट सोसले, तासन्‌तास रांगात राहिले त्यांच्या त्या भावनेला पायदळी तुडवत काळ्याचे पांढरे करणार्‍या या महाभागांना कठोर सजा होऊ शकली तरच या नोटबंदीला काही अर्थ राहील. नोटबंदीतून पळवाट काढणारा कोणत्याही पक्षाचा आणि कितीही मोठा असो, त्याच्यावर कारवाई करण्याची हिंमत सरकारने दाखवली पाहिजे.