- मीना समुद्र
आपल्या आयुष्यात प्रेमाचे पाझर इथून-तिथून फुटत असतात. ‘तो आणि ती’ यामधलेच फक्त हे प्रेम नसून त्याला ममता, वात्सल्य, जिव्हाळ्याची वीण आहे. कडेकपारीतून, खडका-दगडांमधून अशा प्रेमाची एक सरिता वाहत असते आणि आपल्याला सतत जलदान करीत असते.
कुणाच्या ओळी ते माहीत नाही; पण परवा ‘व्हॅलेंटाइन डे’ला आठवल्या-
प्रेमाच्या पाझरांची वाहती एक सरिता
नात्याच्या अतूट शब्दांनी गुंफलेली कविता
जाणिवेच्या पलीकडचं जगावेगळं नाव
यालाच तर आहे आयुष्य हे नाव
आपल्या आयुष्यात प्रेमाचे पाझर इथून-तिथून फुटत असतात. ‘तो आणि ती’ यामधलेच फक्त हे प्रेम नसून त्याला ममता, वात्सल्य, जिव्हाळ्याची वीण आहे. कडेकपारीतून, खडका-दगडांमधून अशा प्रेमाची एक सरिता वाहत असते आणि आपल्याला सतत जलदान करीत असते. कधी जवळच्या तर कधी लांबच्या नात्यातून हे पाझर फुटत राहतात आणि आयुष्यही त्या नात्यांच्या रेशिमबंधाची त्या प्रेमळ शब्दांनी गुंफलेली कविता होऊन जाते, अन् आपल्याही नकळत जाणिवेच्या पलीकडचं जग आपण पाहू लागतो. आणि हेच तर आयुष्य असतं!
प्रेमाच्या पाझरांची ही जीवनदायिनी सरिता! प्रेम नसेल तर ती पार आटून जाईल. जीवनवेल सुकून जाईल. हे मायेचे, कौतुकाचे जलसिंचन नसेल तर ते जीवन मरगळलेले, कोमेजून गेलेले असेल. पण या पाझरांच्या सिंचनामुळे जीव आश्वस्त आणि मन प्रसन्न, आनंदी बनेल. अगदी तान्हुला जीवही हे जाणतो. शब्द नसतील कळत, माणसं नसतील ओळखत, पण मायेचा स्पर्श, प्रेमाची ऊब त्या इवल्याशा जिवालाही कळते. त्याच्या बाबतीतलं वात्सल्य हे प्रेमाचं अतिशय मृदुमुलायम, मवाळ, हळवं असं स्वाभाविक आद्य स्वरूप आहे. मग ते मनुष्यजगतातलं असो की पशुपक्षीजगतातलं असो. म्हणून तर संत जनाबाईंचे अनुभवाचे आणि निरीक्षणाचे बोल आपल्याला पटतात-
पक्षी जाय दिगंतरा, बाळकांसी आणी चारा।
घार हिंडते आकाशी, झांप घाली पिलापासीं॥
झाडावरून हिंडणारी माकडीण आपल्या पिलांना पोटाशी बांधून फिरते. माता कामात कितीही गुंतली तरी तिचे चित्त बाळापाशीच असते. विठूमाऊलीनं आपल्याकडेही नेहमी अशाच वात्सल्ययुक्त नजरेने पाहावे, कोणत्याही संकटात आपले रक्षण करावे, आपली प्रेमळ दृष्टी आपल्यावरून हटवू नये, असे जनीला वाटत राहते. जनी तर नामयाच्या घरी दळण-कांडण करणारी, धुणी-भांडी करणारी एक सर्वसाधारण कामकरी स्त्री. तिला जाणवणारे अनाथपण तिने विठ्ठलाच्या भक्तिप्रेमात बुडविले. विठ्ठलाची, त्या माऊलीची माया आपल्याला सदैव मिळो, अशी आस ऊरी बाळगून राहिली. पण अतिशय विद्वान, समाजभान असणारे आणि विरक्त, तत्त्वचिंतक, साधू-संतांसारखे असणारे आचार्य विनोबा भावे भगवद्गीतेच्या प्रेमात इतके आकंठ बुडून जातात की स्वतःला अजाण बालक नव्हे, बाळच समजून म्हणतात-
गीताई माऊली माझी, तिचा मी बाळ नेणता
पडता रडता घेई उचलोनी कडेवरी
असे म्हणताना गीतेकडून मातृत्वाच्या ममत्वाबद्दल आणि वात्सल्याबद्दल श्रद्धा आणि विश्वास तसेच कृतज्ञताही व्यक्त करतात.
आईला आपले मूल कितीही मोठे झाले, ते कितीही जवळ वा दूर असले तरी त्याच्याबद्दल ममत्व असते, चिंता असते, काळजी असते. मुलगा असो वा मुलगी- तो तिच्या जिवाचा तुकडा असतो. आणि त्या मातृत्वापायी कितीही खस्ता खाव्या लागल्या, कितीही संकटे आली तरी ती धीर सोडत नाही- खंबीरपणे उभी राहते; वादळवाऱ्याला निर्भीडपणे तोंड देत. अक्षयपात्रासारखे तिचे वात्सल्य भरभरून ओसंडत असते. तिच्या नजरेतून, हालचालीतून, कृतीतून ती माया भरभरून वाहत असते. वास्तविक पाहता आई होणे सोपे नसते. तो खरोखरीच बाईचा दुसरा जन्मच असतो. पण ही नैसर्गिक सृजनेच्छा आणि बाळाचा जन्म ही तिच्यासाठी जन्मभराची पुंजी असते. या ईश्वरी वरदानाबद्दल ती देवाचीच नाही तर त्या बाळाचीही कृतज्ञ होते आणि म्हणते-
बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई।
आई होणे ही जणू जगातली सर्वश्रेष्ठ पदवी मिळवणे. बाळामुळे जीवनाला पूर्णता येते. बाळाच्या निरागस मुखाचं चुंबन घेतलं, त्याच्या टाळूचा उदाधुपाचा वास हुंगला की तिचं हृदय वात्सल्यानं भरून येतं, ऊरी पान्हा फुटतो. हे मातेचं दूध म्हणजे जणू अमृतसरिता असते. बाळासाठी तिच्या ऊरी असे प्रेमाचे पाझर फुटत राहतात आणि तिच्या गर्भातून बाहेर आल्यानंतर नाळ तोडली तरी त्यांचे आंतरिक बंध कायम राहतात. बाळाच्या साखरझोपेसाठी आई अंगाई गाऊ लागते. जगात कुठलीही भीक, कुठलेही दान मिळू शकते, पण आई नाही! त्यामुळेच प्रत्यक्ष ईश्वर- तिन्ही जगाचा तो स्वामी- आईविना भिकारीच राहतो. त्यामुळे देवाहूनही महन्मंगल अशा मातृदैवतालाही महानता येते. बाळ जेव्हा ‘आई’ अशी हाक मारते तेव्हा तिचा जन्म सार्थ होतो. इरावती कर्वेंसारखी विदुषीही तिच्या मुलाचे नाव घेऊन कोणीतरी त्याची आई असा उल्लेख करते तेव्हा खूप आनंदित होते आणि आपल्या जन्माची परिपूर्ती झाल्यासारखे तिला वाटते.
बाळाच्या कोणत्याही क्रियेने मातृहृदय कसे उचंबळून येते हे शिरीष पै यांच्या एका कवितेत वाचून पटते. विशेष म्हणजे मालवणच्या साहित्यसंमेलनात त्यांनी ही कविता वाचली होती, हे वाचून आश्चर्य वाटते. आणि स्त्री-हृदयाच्या वात्सल्याचा पुन्हा एकदा साक्षात्कार होतो. ती कविता अशी-
बाळ जन्मले तेव्हा मीही फिरून जन्मले
बाळ स्तनाला ओढी तेव्हा भरती झाले
बाळ प्रकाशा पाही डोळे माझे दिपले
बाळ हसू लागला मीही नव्याने हसले
बाळ लागता चालू पंख मला तर फुटले
बाळ म्हणाले ‘आई’ मी गंगेत बुडाले
अतिशय सहजसाध्य शब्दात बाळाबद्दल आईच्या भावना आणि त्याच्याशी तिची एकरूपता व्यक्त झाली आहे. ‘आई’ या नुसत्या हाकेने तिला पवित्र गंगास्नान घडल्यासारखे वाटते. सर्वसाधारण संसारी स्त्री असो की ज्ञानसागरात अखंड डुंबणारी शिरीष पैंसारखी लेखिका, कवयित्री, विदुषी असो; ‘आई’ही त्या पंडितेची सर्वोच्च पदवी आहे.
हे बाळ हळूहळू मोठे होऊ लागते आणि त्याच्या बाललीलांनी घरदार समृद्ध होते. आईचे तर ते सर्वस्व असते. इंदिरा संत या अत्यंत लोकप्रिय महान कवयित्री. सुगंधी शतदलकमलासारखी उमलणारी त्यांची प्रतिभा बाबलीलांनी सुखावली नाही आणि शब्दावली नाही तरच नवल! ‘बाळ उतरे अंगणी’ या कवितेत त्या म्हणतात-
बाळ उतरे अंगणी आंबा ढाळतो साऊली
चिमुकल्या पायाखाली सारी मखमल सावळी
या मखमलीवर बाळ खेळताना बाळाच्या हाती फुले यावीत म्हणून सायलीची डहाळी खाली वाकते. बाळ चिमण्यांसाठी दोन्ही मुठी उंचावून कण्या शिंपतो तेव्हा त्या चिमण्यांचा आणि पाखरांचा थवा भराभर झाडावरून उतरून खाली येतो. त्या चिऊताया म्हणजेच बाळाची खेळणी होतात आणि ते चिमुकले अंगण जणू बाळाभोवती राखण करते. निर्व्याजतेने दिलेल्या प्रेमाची भोवतालच्या परिसराला आणि निसर्गालाही जाण असते हेच तर निसर्गवेड्या त्या आईला सुचवायचे असेल ना? एक सर्वसामान्य ग्रामीण स्त्री बाळाला परसात न्हाऊमाखू घालताना म्हणते-
माझ्या गं परसात बाळ न्हाते, बाळ न्हाते
त्याचे पाणी शेवंतीला जाते
बाळाच्या अंगावरून वाहणारं ते नवकांतीचं, सायहळदीचं ते पाणी परसात जाते आणि त्यावर शेवंती पिवळीधम्मक, तजेलदार, उदाधुपाच्या वासानं मंदसुगंधी होते. किती तरल, मृदुमालायम ही वात्सल्यभावना!