काळा पैसा भारतात आणण्यात मोदी सरकार अपयशी

0
85

राहुल गांधी यांची जोरदार टीका
केंद्रात सत्तेवर आल्यानंतर १०० दिवसांत विदेशातील बँकांमध्ये दडवलेला काळा पैसा भारतात आणण्यात अपयशी ठरल्याबद्दल कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर काल जोरदार टीका केली.प्रशासन ही एक कला असते आणि त्यासाठी संयम आणि गांभीर्य असावे लागते. नेमक्या या गोष्टींचा भाजपात अभाव आहे अशी टिप्पणीही राहुल गांधींनी केली. पलमाऊ जिल्ह्यातील एका निवडणूक प्रचारसभेत ते बोलत होते. कॉंग्रेसचे सरकार सत्तेत असताना काळ्या पैशाच्या प्रश्‍नावरून कॉंग्रेस सरकारची थट्टा उडवली जायची याकडे त्यांनी भाजपचे यावेळी लक्ष वेधले. मात्र आता ती पाळी भाजपा सरकारवर आली त्यावेळी ते सपशेल अपयशी ठरले असल्याचे ते म्हणाले. युपीएच्या राजवटीवेळी काळा पैसा भारतात आणण्यासाठीच्या मार्गात अडथळे येत होते व ते सरकार त्याची वाच्यता करायचे. आता त्याच अडथळ्यांच्या गोष्टी मोदी सरकारकडून सांगितल्या जात आहेत याकडे राहुल यांनी लक्ष वेधले. छोटा नागपूर व संथाल परगणा येथे कूळ कायद्यात दुरुस्त्या आणण्यासाठी भाजपचे प्रयत्न चालू आहेत याकडे लक्ष वेधून त्यांनी कॉंग्रेस आदिवासींच्या जमिनींच्या रक्षणासाठी या दुरुस्त्यांना विरोध करेल असे त्यांनी सांगितले. झारखंडमध्ये १४ पैकी ९ वर्षे भाजपचीच सत्ता होती. तेथे भ्रष्टाचार वळला असल्याचा दावा त्यांनी केला. या राज्यात कॉंग्रेसची सत्ता कधीच नव्हती असेही ते म्हणाले.