केंद्रातील भाजप सरकारला देशाबाहेर असलेला काळा पैसा परत आणण्यात रस नसल्याचा आरोप राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांनी काल पत्रकारांशी बोलताना केला. देशाबाहेर नेऊन ठेवलेला काळा पैसा परत आणणार असल्याच्या वल्गना भाजप लोकसभा निवडणुकीपूर्वी करत होता. पण आता जाणीवपूर्वक त्यासाठी विलंब केला जात असल्याचे नाईक म्हणाले.
काळ्या पैशांसाठीच्या प्रश्नावर अभ्यास करण्यासाठी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून सरकार काळा पैसा परत आणण्याच्याबाबतीत विलंब करीत असल्याचे नाईक यांनी यावेळी सांगितले. शिक्षक दिनाचे गुरू उत्सव असे जे नामकरण करण्यात आले आहे तो शिक्षणाचे भगवीकरण करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग असल्याचा आरोपही शांताराम नाईक यांनी यावेळी केला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भाजपात आपले वर्चस्व निर्माण करू पाहत असून त्यासाठीच त्यानी पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी आदी नेत्यांना बाजूला सारल्याचे नाईक म्हणाले. दरम्यान, कॉंग्रेस पक्षाच्या गोव्याच्या स्थितीविषयी आपण पक्षश्रेष्ठींकडे चर्चा केली असल्याचे ते पत्रकारानी त्यासंबंधी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले. आपण सतत पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात असल्याचे ते म्हणाले. राज्यातील कॉंग्रेस कार्यकर्ते खचलेले आहेत हा आरोप त्यांनी फेटाळला.