वास्को मतदारसंघातून दोन वेळा भाजपच्या उमेदवारीवर निवडून आलेले कार्लुस आल्मेदा यांनी काल कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. मुरगाव नगरपालिकेतील काही नगरसेवकांनी यावेळी त्यांच्यासमवेत कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. आल्मेदा यांनी काल विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व कॉंग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांच्या हजेरीत कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.
आपल्या समर्थकांशी योग्य ती चर्चा केल्यानंतरच आपण हा निर्णय घेतल्याचे कार्लुस यांनी कॉंग्रेस प्रवेशानंतर बोलताना स्पष्ट केले. भाजपने गेल्या ३० नोव्हेंबर रोजी कृष्णा ऊर्फ दाजी साळकर यांना भाजपात प्रवेश दिल्यामुळे पुढील विधानसभा निवडणुकीत भाजप कार्लुस आल्मेदा यांना उमेदवारी देणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे कार्लुस यांनी आमदारकीचा व भाजपच्या प्राथमिक सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला.
प्रतापसिंह राणें यांना पर्येतून
कॉंग्रेसतर्फे उमेदवारी जाहीर
कॉंग्रेस पक्षाने काल पर्ये मतदारसंघातून ज्येष्ठ कॉंग्रेस नेते प्रतापसिंह राणे यांना पक्षाची उमेदवारी जाहीर झाली आहे. मागची गेली ५० वर्षे सतत प्रतापसिंह राणे हे आमदार म्हणून गोवा विधानसभेवर निवडून आलेले असतानाच मंगळवारी त्यांचे पुत्र विश्वजित राणे यांनी आता आपल्या वडिलांचे वय झालेले असल्याने त्यांनी राजकारणातून संन्यास घेणेच योग्य ठरणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. तसेच त्यांनी पर्येतून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केल्यास आपण त्याच मतदारसंघातून त्यांच्याविरूद्ध भाजपच्या उमेदवारीवर उभा राहून त्यांचा पराभव करणार असल्याचे म्हटले होते. कॉंग्रेसचे सटचिटणीस मुकूल वासनीक यांनी काल प्रतापसिंह राणे यांची पर्येतून उमेदवारी जाहीर केली.