कार्यकर्त्यांच्या नजरेतून मनोहर पर्रीकर…

0
334

स्व. मनोहर पर्रीकर यांची आज प्रथम पुण्यतिथी. त्यांच्याविषयी नेहमीच त्यांचे कुटुंबीय, बालमित्र, स्नेही आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून वेळोवेळी भरभरून लिहिले गेले आहे. आम्ही यावेळी लिहिते केले आहे, पणजीतील त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना…

कार्यकर्त्यांच्या कामांचे स्मरण ठेवायचे
राजेंद्र भोबे
स्व. मनोहर पर्रीकर हे आगळे वेगळे व्यक्तिमत्त्व होते. पर्रीकर यांनी आपल्या स्वभावातील वेगळ्या गुणांच्या आधारावर समाजात त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कार्यामुळे या दूरदर्शी नेतृत्वाची ओळख सर्वांना झाली. त्यांची बुद्धी तल्लख आणि स्मरणशक्ती चांगली होती. कुणाही कार्यकर्त्याने सांगितलेल्या कामाची त्यांना आठवण असायची. तो कार्यकर्ता भेटल्यानंतर त्यांच्या कामाबाबत माहिती देऊन अमुक वेळी तुमचे काम होईल, असे ते खात्रीने सांगायचे. ते नेहमी हाती घेतलेल्या कामाचा पाठपुरावा करायचे.
एखादा विषय मांडल्यानंतर त्यांच्याकडून त्वरित उत्तर मिळावे असे प्रत्येकास वाटायचे. पर्रीकर काही प्रश्‍नांबाबत उत्तर त्वरित देत नसत. प्रश्‍न समजून घेऊन पुढे जात असत. त्यामुळे एखाद्याला वाटायचे की पर्रीकर आपला प्रश्‍न ऐकून घेत नाही, परंतु सात – आठ दिवसांनंतर स्वतः फोन करून त्या विषयाबाबत निर्णय कळवायचे. कामाचा प्रचंड व्याप असताना सुध्दा प्रत्येक व्यक्तीने सांगितलेल्या कामाची अशी आठवण ठेवून कामाच्या पूर्तीसाठी ते प्रयत्न करीत असत.
आपुलकी, कार्यप्रवणता ही त्यांच्या स्वभावातच होती. समाजासाठी उत्तरदायित्वाच्या भावनेतून ते काम करायचे. त्यांच्यासाठी बुद्धी ही दैवी देणगीच होती. त्यांच्यासमवेत २० वर्षे काम करण्याची संधी मला मिळाली. पर्रीकर यांना मनुष्याची पारख करण्याची कला चांगलीच अवगत होती. एखाद्या व्यक्तीची प्रामाणिकपणाची परीक्षा ते नकळत घेत असत. मला स्वतःला याचा दोनदा अनुभव आला.
राजकीय क्षेत्रात पर्रीकरांनी आपला वेगळा ठसा उमटविला. आर्थिक, सामाजिक स्तरावर ते नेहमीच सकारात्मक विचार घेऊन पुढे जात असत. एखाद्या व्यक्तीवर विश्वास बसल्यानंतर त्याच्यावर विश्वासाने काम सोपवून मोकळे होत असत.

असा नेता पुन्हा होणे नाही
देवानंद माईणकर
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासारखा नेता पुन्हा होणे नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हांला चांगले कार्य करण्याची संधी मिळाली. पर्रीकरांनी स्वतःबरोबर आम्हांला नावलौकिक मिळवून दिला.
मी मनोहर पर्रीकर यांच्यासोबत १९९२ पासून काम करण्यास सुरुवात केली. अखेरच्या क्षणापर्यंत पर्रीकरांना साथ दिली. भाईंच्या शब्दाबाहेर कधी काम केले नाही. त्यामुळेच पर्रीकर आमच्या कुटुंबातील कार्यक्रमात, सोहळ्यात न चुकता हजर राहायचे. केंद्रीय संरक्षणमंत्रिपदी असताना वाढदिवसाला रात्री १०.३० वाजता हजेरी लावली होती. सुरुवातीच्या काळात पणजीत भाजपचे फलक लावण्यासही कुणी पुढे येत नसे, परंतु, पर्रीकर यांचे बॅनर लावण्याचे काम मी न डगमगता केले. पर्रीकर यांच्यासोबत काम करताना भरपूर अनुभव मिळवला. त्या अनुभवाच्या चांगला फायदा जीवनात होत असून निरंतर कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
पर्रीकर यांच्या सहकार्यातून पत्नीला नगरसेवक म्हणून कार्य करण्याची संधी प्राप्त झाली. प्रभागात विविध विकासकामे राबविण्यात यश प्राप्त झाले आहे. पर्रीकर यांच्याकडून फाईलवर शेरा मारून घेतल्यानंतर अधिकारी सुध्दा कामाबाबत सहसा नकार देत नसत, एवढा त्यांचा प्रशासनावर धाक होता.

शेवटपर्यंत आपुलकी राखली
– मीनाक्षी लवंदे
स्व. मनोहर पर्रीकर यांनी आपुलकी व जिव्हाळा शेवटपर्यंत कायम ठेवला होता. त्यांचे वागणे, राहणे साधेपणाचे होते. दुसर्‍यांना मदत करणे हा त्यांचा उपजत स्वभावगुण होता. या स्वभावगुणामुळे आजही प्रत्येक कामाच्या वेळी पर्रीकरांची हमखास आठवण येते.
पर्रीकर एखाद्या वेळी कार्यकर्त्यांकडून कुठलीही चूक झाली तर समजून घेत असत. तसेच एखादा कार्यकर्ता नाराज असल्यास त्याची नाराजी दूर करून पुन्हा त्याला नव्या जोमाने कार्य करण्यास प्रोत्साहन देत असत. नाराज बनलेल्या व्यक्तीची नाराजी दूर करण्यात ते पटाईत होते. रक्षामंत्री झाल्यानंतर सुध्दा फोन केल्यास ते उत्तर द्यायचे. एखाद्या वेळी कामात गुंतलेले असल्यास सवड मिळाल्यानंतर विचारपूस करायचे. घरगुती कार्यक्रम, वाढदिवस असल्यास मुद्दाम फोन करून शुभेच्छा देत असत.
माझे सासरे आजारी होते. त्यांच्या आजारावेळी एक वैद्यकीय उपकरण भरपूर प्रयत्न करूनही बाजारात उपलब्ध नव्हते. अखेर, मनोहरभाईकडे हा विषय मांडला. त्यांनी मेधा पर्रीकर ट्रस्टच्या माध्यमातून ती वस्तू उपलब्ध करून दिली. काम केल्यानंतर पुन्हा फोन करून तुझे काम केल्याची माहितीही ते देत असत. सर्वांशी आपुलकीने वागणे त्यांच्या स्वभावात होते.

न भरून येणारी पोकळी
– रवींद्र आमोणकर
मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर राज्यात निर्माण झालेली पोकळी न भरून येणारी आहे. आमची पर्रीकरांकडून कामाची अपेक्षा नव्हती, तर, पर्रीकर हे आमच्यासाठी मोठे आधारस्तंभ होते. विचारवंत, सचोटी, प्रामाणिकपणा या गुणांमुळे त्यांनी जनमानसात आदराचे स्थान प्राप्त केले. ते आमच्या घरातील व्यक्ती असल्याप्रमाणे वागत असत. घरातील सर्व सोहळ्यांत न चुकता सहभागी होत असत. मुलाच्या लग्नाला काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत, त्यामुळे मुलाच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला न चुकता उपस्थिती लावली. प्रत्येक सणाच्या वेळी आमच्या घरी फेरी मारायचे. निवडणुकीच्या काळात पर्रीकरांच्या प्रचाराचे कार्य करण्याची संधी मिळत होती. भाजपच्या बैठकासुद्धा आमच्या घरात घेतल्या जायच्या. आज पदोपदी त्यांचे स्मरण होते.

शेवटपर्यंत आपुलकी राखली
– मीनाक्षी लवंदे
स्व. मनोहर पर्रीकर यांनी आपुलकी व जिव्हाळा शेवटपर्यंत कायम ठेवला होता. त्यांचे वागणे, राहणे साधेपणाचे होते. दुसर्‍यांना मदत करणे हा त्यांचा उपजत स्वभावगुण होता. या स्वभावगुणामुळे आजही प्रत्येक कामाच्या वेळी पर्रीकरांची हमखास आठवण येते.
पर्रीकर एखाद्या वेळी कार्यकर्त्यांकडून कुठलीही चूक झाली तर समजून घेत असत. तसेच एखादा कार्यकर्ता नाराज असल्यास त्याची नाराजी दूर करून पुन्हा त्याला नव्या जोमाने कार्य करण्यास प्रोत्साहन देत असत. नाराज बनलेल्या व्यक्तीची नाराजी दूर करण्यात ते पटाईत होते. रक्षामंत्री झाल्यानंतर सुध्दा फोन केल्यास ते उत्तर द्यायचे. एखाद्या वेळी कामात गुंतलेले असल्यास सवड मिळाल्यानंतर विचारपूस करायचे. घरगुती कार्यक्रम, वाढदिवस असल्यास मुद्दाम फोन करून शुभेच्छा देत असत.
माझे सासरे आजारी होते. त्यांच्या आजारावेळी एक वैद्यकीय उपकरण भरपूर प्रयत्न करूनही बाजारात उपलब्ध नव्हते. अखेर, मनोहरभाईकडे हा विषय मांडला. त्यांनी मेधा पर्रीकर ट्रस्टच्या माध्यमातून ती वस्तू उपलब्ध करून दिली. काम केल्यानंतर पुन्हा फोन करून तुझे काम केल्याची माहितीही ते देत असत. सर्वांशी आपुलकीने वागणे त्यांच्या स्वभावात होते.

बांदोडकरांनंतरचा खरा लोकनेता
ऍड. संजय उसगावकर
पर्रीकर यांचा १९९४ मधील गोवा विधानसभा निवडणुकीतील पणजी मतदारसंघातील विजय हा माझ्या जीवनातील चार आनंदाचा क्षणांपैकी एक आहे. आत्मविश्वास, चिकाटी यांच्या जोरावर पर्रीकर यांनी ९४ च्या विधानसभा निवडणुकीत तो विजय संपादन केला. भाऊसाहेब बांदोडकर यांच्यानंतरचा लोकनेता म्हणून पर्रीकर यांच्या नावाबाबत दुमत असू शकत नाही.
पणजी मतदारसंघातील जनसंघ आणि भाजपचा एक क्रियाशील कार्यकर्ता म्हणून कार्य करताना पर्रीकर यांच्यासाठी १९९४ साली माझ्याकडे पहिल्यांदा पक्षीय कार्याची मोठी जबाबदारी देण्यात आली होती. विजयामुळे पर्रीकरांसाठी केलेल्या प्रचारकार्याचे चीज झाल्याने समाधान वाटते. पर्रीकर यांची साधी राहणी, उच्च विचार स्पृहणीय होते. पदाबाबत कुठलाही बडेजाव नव्हता. उत्तम प्रशासक होते. पर्रीकर हे पणजीचे आमदार होण्यापूर्वी पणजीत सणाच्या काळात मारामारीसारखे प्रकार होत होते. परंतु, पर्रीकर यांच्या कार्यकाळात मारामारीचे हे प्रकार बंद झाले. पर्रीकर म्हणजे उत्तम संस्कारांतून घडलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे पणजीत त्यांच्या विरोधात विरोधी पक्षाला त्या तोडीचा उमेदवारही मिळत नसे. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते मतदारसंघात लोकसंपर्क कायम ठेवत असत. घरगुती सोहळ्यामध्ये सहभागी होऊन भावनिक नाते निर्माण करीत. पर्रीकर यांच्या चांगल्या गुणामुळे जनमानसात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. पर्रीकर यांचा पहिला कार्यकाळ चांगला झाला, परंतु दुसर्‍या कार्यकाळात आम्हांला थोडेसे नाराज केले. पर्रीकर आपल्या कार्याला उंची देतील अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. परंतु, अनेक कार्यकर्त्यांची अपेक्षा फोल ठरली. त्यांनी आपल्या अंगातील काही अवगुणांमध्ये वेळीत सुधारणा केली असती तर त्यांचे व्यक्तिमत्त्व आणखी उठावदार नक्कीच झाले असते. भाई आपल्या कुटुंबातील दुःख सहसा कुणासमोर मांडत नसत. आपण पत्नीला आजारपणात आपण योग्य न्याय देऊ शकलो नाही याची खंत सदैव त्यांच्या मनात होती. आपले हे दुःख काही मोजक्याच व्यक्तींच्या समोर व्यक्त करीत असत. आजचे राजकारणी आपल्या मुलांना सुध्दा राजकारणात सहभागी होण्यास सांगतात. पर्रीकर यांनी दोन्ही मुलांना आपल्या सोबत राजकारणात आणले नाही.

गरजेच्या वेळी मदतीला धावायचे
– पूनम साळगावकर
मनोहर पर्रीकर यांना कुठल्याही पदाचा बडेजाव नव्हता. केंद्रात संरक्षणमंत्री बनले तरी स्वभावात साधेपणा होता. सर्वांशी मिळून – मिसळून वागायचे, प्रत्येकाची विचारपूस करीत असत. कार्यकर्त्यांच्या घरात अगदी स्वयंपाकघरापर्यंत जाऊन कुटुंबाबाबत विचारपूस करीत असत.
एखादा कार्यकर्ता त्यांचे काम न झाल्याने नाराज असल्याचे लक्षात येताच त्याला पुढील वेळी तुझे काम नक्की होईल, असा विश्‍वास देत असत. सर्वांना समान वागणूक देत असत. त्यांनी लहान – मोठा असा भेदभाव केला नाही. त्यांचा चेहरा नेहमी हसरा असायचा. आपले कौटुंबिक दुःख त्यांनी कधीच दाखवून दिले नाही. साधी राहणी आणि उच्च विचारांना नेहमीच प्राधान्य दिले. गरजेच्या वेळी ते हमखास मदतीला कसे धावत होते, याचा मी सुध्दा अनुभव घेतला आहे. बाहेरगावी असले तरी संबंधिताशी संपर्क साधून आवश्यक मदत करण्याची सूचना करायचे. मुख्यमंत्री, संरक्षणमंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर सुध्दा गरजेच्या वेळी मदतीला धावून यायचे. प्रत्येकाने सांगितलेल्या कामाची आठवण ठेवायचे, भेटल्यानंतर कामाबाबत विचारपूस करायचे.

रात्री अडीच वाजताही फोन घेतला
– गौरी कामत
मनोहरभाईंसोबत सुमारे २४ वर्षे कार्य करण्याची संधी मला मिळाली. त्यांना कुठल्याही पदाचा बडेजाव नव्हता. त्यांनी सदैव साधी राहणी, उच्च विचारांना प्राधान्य दिले. पर्रीकरांमुळे माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना पणजीतील जनतेकडून आदर मिळत होता. नागरिकांच्या तक्रारी पर्रीकरांपर्यंत पोचविण्याचे कार्य मी करायचे. पर्रीकर आपआपल्या परीने लोकांच्या तक्रारी सोडविण्याचे काम करीत होते. आता त्यांच्या पश्‍चात आम्हां सर्वांना पावलोपावली त्यांची आठवण येते. भाईंनी नेहमी स्नेह वाढविण्यास प्रोत्साहन दिले. नवी दिल्लीत संरक्षणमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सुध्दा मनोहरभाईंनी आपल्या राहणीत वा स्वभावात बदल केला नाही. कामाच्या व्यापामुळे त्यांना फोन घ्यायला मिळाला नाही, तर नंतर फोन करून विचारपूस करायचे.
नवी दिल्ली येथे पर्रीकर असताना एकदा एका खास कामानिमित्त रात्री २.३० वाजता फोन करावा लागला. पण त्यांनी फोन स्वीकारून विचारपूस केली. त्यानंतर सांगितलेल्या कामाबाबत दुसर्‍यांना योग्य सूचना दिल्यानंतर त्यांनी पुन्हा मला फोन करून काम केल्याची माहिती दिली.

वज्रादपि कठोरानि, मृदुनि कुसुमादपि
– राजू सुकेरकर
स्वं. मनोहर पर्रीकर हे अजब व्यक्तिमत्त्व होते. ते बाहेरून फणसासारखे कठोर दिसत असले तरी आतून मऊ, रसाळ होते. त्यांनी गोव्यातील राजकारणाचा मुखवटा बदलून टाकला. त्यांना कुठल्याही प्रकारच्या चौकटीत बांधून ठेवणे शक्य नाही. त्यांच्यात अभ्यासूवृत्ती, धीटपणा होता. त्यामुळे न घाबरता निवडणूक, मोर्चा आदींना सामोरे जात असत. एकांत हवा असल्यास आमच्या घरी येऊन तास-दोन तास काही न बोलता बसत असत. मी दोन तीन वेळा हा अनुभव घेतला आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री म्हणून कार्यरत असतानाही त्यांनी साधेपणा कायम ठेवला होता. मुंबईसारख्या शहरात सुध्दा कुठल्याही प्रकारची सुरक्षा न घेता ते फिरत असल्याचे डोळ्यांनी पाहिले. मुंबई विमानतळावरून जाताना केवळ रस्त्यावर वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून आपल्या वाहनाच्या समोर फक्त पोलीस पायटल गाडी तेवढी ठेवण्याची सूचना ते करायचे.

विकासकामांत भेदभाव केला नाही
– राजेश केळुस्कर
मनोहर पर्रीकर यांनी पणजीमध्ये विकासकामे करताना कुठलाही भेदभाव कधीच केला नाही. आम्ही एखादी व्यक्ती दुसर्‍या पक्षाची आहे, असे पर्रीकर यांच्या नजरेस आणून देत असू. त्यावेळी ते म्हणायचे की आपण मतांसाठी विकासकामे करीत नाही, तर माणुसकीच्या दृष्टिकोनातून विकासकामे करीत असतो. केवळ मते मिळविण्याचा उद्देश नाही, असे भाई नेहमीच सांगायचे.
त्यांनी भेदभाव न करता विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांची कामे सुध्दा केली. मनोहर पर्रीकर हे सामान्य कार्यकर्त्यांचे आधारस्तंभ होते. हा आधारस्तंभ निखळून पडल्याने निष्ठावंत कार्यकर्ते पोरके झाले आहेत. पणजीत पर्रीकर यांच्या तोडीचा दुसरा नेता नसल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांतील उत्साह कमी झाला आहे.

गोव्याचे न भरून येणारे नुकसान
– दिलीप धारवाडकर
स्व. मनोहर पर्रीकर यांच्या अकाली निधनाने गोव्याचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. आमच्या कुटुंबाशी पर्रीकर यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. धडाडी, चिकाटी, हुशारी हे प्रमुख गुण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होते. कठीण परिस्थितीतून वाट शोधण्यात हुशार होते. अडीअडचणीवर मात करण्याची कला चांगली अवगत होती. साधी राहणी आणि परिपक्व विचारांचे ते एक आदर्श राजकारणी होते.

समाजकारणासाठी राजकारण केले
– केदार पडते
मनोहर पर्रीकर हे एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व होते. राज्यातील इतर राजकारण्यांपेक्षा पर्रीकर यांचा स्वभावगुण वेगळाच होता. त्यांनी गोमंतकीय जनतेची सेवाभावे व निष्ठेने सेवा केली. केवळ स्वार्थासाठी नव्हे, तर समाजकारणासाठी राजकारणाचा वापर केला. गोव्याच्या हितासाठी कार्य करताना जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी जनसेवेला प्राधान्य दिले.