गोमंतकाचे आणखी एक लखलखते नक्षत्र निमाले. मोहनदास सुखटणकर गेले. मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि दूरचित्रवाणीच्या जगातील एक उमदा कलावंत आपल्यातून निघून गेला. जातेसमयी त्यांचे वय ९३ होते. अर्थात, जाताना जीवनाचे साफल्य आणि कृतार्थता यांची सोबत होती, परंतु तरीही हे जाणे चटका लावणारे आहे. नव्वदीपारचे आयुष्य हे बोनससारखे असते, परंतु या वयातही तल्लख स्मृती आणि खणखणीत आवाज याची दैवी देण सुखटणकरांना लाभली होती. आश्चर्य वाटेल, परंतु या वयातही व्हॉटस्ऍपसारख्या समाजमाध्यमावर ते सक्रिय असायचे. जिंदादिली हे त्यांच्या स्वभावाचे खास गोमंतकीय वैशिष्ट्य. ती त्यांनी शेवटपर्यंत जपली होती.
कलावंत म्हणून तर ते थोर होतेच, परंतु ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’साठी ते सदैव एक कार्यकर्ता म्हणूनच ते वावरले. त्या संस्थेची त्यांनी निष्ठेने सेवा केली. विनामानधन हजारो प्रयोग केले. संस्थेला गरज भासली, तेव्हा तेव्हा पडेल त्या भूमिकेत उभे राहिले, कुठेही कसलीही उणीव भासू दिली नाही. ‘गोवा हिंदू’च्या नाटकांचे आठ ते दहा हजार प्रयोग झाले असतील, तर त्यातील तीन ते चार हजार नाटकांत आपण विनामानधन भूमिका केल्याचे ते अभिमानाने सांगत असत. आपण संस्थेचे कार्यकर्ते होतो व कार्यकर्त्याने पैसे कसे स्वीकारायचे, असा त्यांचा यावर सवाल असे. आपण आयुष्यात ३६५ दिवस केवळ रंगभूमीची सेवा केली. संस्था हेच आपले दुसरे घर होते. मुले केव्हा मोठी झाली हेही या नादात कळले नाही, आपल्या मुलांना तर आपण झोपलेल्या स्थितीतच जास्त पाहिले असे ते सांगायचे.
‘रायगडाला जेव्हा जाग येते’ सारख्या नाटकात आपण शिवाजीची भूमिका सोडून अन्य सर्व भूमिका केल्या, ‘मत्स्यगंधा’मध्ये चंडोल झालो, ‘लेकुरे..’त दासोपंताची भूमिका निभावून नेली, ‘अखेरचा सवाल’मध्ये हरिभाऊ, दुर्गीमध्ये मोरोबा नाडकर्णी बनलो. मिळेल ती भूमिका निष्ठेने निभावून नेली असे सुखटणकर सांगत. ‘कैवारी’, ‘जावई माझा भला’, ‘थोरली जाऊ’, ‘निवडुंग’ यासारख्या कित्येक मराठी चित्रपटांमधून त्यांनी भूमिका केल्या. ‘दामिनी’, ‘बंदिनी’सारख्या दूरचित्रवाणी मालिकाही केल्या. अभिनयाकडे आवड म्हणून त्यांनी पाहिले, त्याचा धंदा केला नाही. नाट्यकलेसारख्या बिनभरवशाच्या क्षेत्रात पाऊल टाकले, तरी उच्च शिक्षण आणि चरितार्थासाठी नोकरी याकडे त्यांनी मुळीच दुर्लक्ष केले नव्हते. त्यामुळे ताठ मानेने ते या क्षेत्रात वावरले. सहज अभिनयाची देण त्यांना लाभली होती. अभिनय हा अभिनय न वाटणे हाच खरा अभिनय असतो. सुखटणकरांचा अभिनय हा त्या जातकुळीचा होता. त्यात सहजता असे. जुन्या पिढीतील कलावंतांमध्ये आजच्या कलावंतांविषयी अनेकदा एक प्रकारची अढी दिसते. सुखटणकरांच्या ठायी तिचा लवलेशही नव्हता. उलट दूरचित्रवाणी वाहिनीवरच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात धमाल उडवून देणार्या समीर चौगुलेला त्यांनी खास फोन करून ‘‘मी ९३ वर्षांचा आहे रे, नाही तर तुला भेटायला मीच आलो असतो’’ म्हणत अंधेरीच्या आपल्या घरी बोलवून घेतले. नुसताच पाहुणचार केला नाही, शाल आणि श्रीफळ देऊन त्या गुणी कलाकाराचा सत्कार केला. ही अस्सल गोमंतकीय दिलदारी सुखटणकरांनी सगळे वास्तव्य मुंबईत जाऊनही जपली होती.
आपल्या गोव्याविषयी त्यांच्या मनात आत्यंतिक प्रेम. त्यांची जन्मभूमी माशेल. पण त्यांचे बालपण म्हापशाला गेले. सारस्वत विद्यालयात आणि नंतर गुंडू आमोणकरांच्या अँग्लो पोर्तुगीज इन्स्टिट्यूटमध्ये – म्हणजे आजच्या न्यू गोवा हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. वर्गात गोंधळ घालतो म्हणून आरोंदेकर मास्तरांनी त्याला ‘खोडकर बंडू’ नावाच्या नाट्यछटेत रंगमंचावर उभे केले. तेव्हा चेहर्याला जो रंग लागला, तो मग उतरलाच नाही. आपल्या या शाळेविषयी, म्हापशाविषयी सुखटणकरांना या वयातही प्रचंड ओढ लागली होती. अलीकडेच स्नेहमंदिरतर्फे त्यांचा सत्कार झाला, तेव्हा गोव्यात आल्या आल्या आपण आधी म्हापशात जाणार, जिथे आपण बालपणी राहायचो ते घर आपल्याला पहायचे आहे, ती शाळा आपल्याला बघायची आहे असे ते पुन्हा पुन्हा सांगत होते. खरोखरच गोव्यात आल्या आल्या त्यांनी म्हापशाला जाऊन त्या आपल्या भूमीचे भावभरल्या अंतःकरणाने मनःपूत दर्शन घेतले. बालपणीच्या आठवणींनी आसवे गाळली. रंगभूमीवर सुखटणकरांनी अतोनात प्रेम केले. आपल्याला पुनर्जन्म लाभला तर नाट्यकलेचा विद्यार्थी म्हणून नव्याने जन्म घ्यायला आपल्याला आवडेल अशी भावना ते सतत व्यक्त करायचे. त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमीचा एक चालता बोलता इतिहास पुसला गेला आहे एवढे खरे.