डिचोली ते साखळी या महामार्गावर कोदाळ-कारापूर येथे एका दुचाकीला धडक देऊन कारचालकाने पलायन केले. काल दुपारी झालेल्या या अपघातात बेळगावमधील दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला. आदर्श प्रभाकर मुरगुड (28) असे मृत तरुणाचे नाव आहे. ह्या ‘हिट अँड रन’ प्रकरणी डिचोली पोलिसांनी गतिमान तपास करत कारचालकाला अटक केली.
सविस्तर माहितीनुसार, काल दुपारी 1 च्या सुमारास हा अपघात घडला. बेळगाव येथील आदर्श प्रभाकर मुरगुड हा तरुण आपल्या दुचाकीवरून (क्र. केए-22-ईयू-3444) डिचोली येथून साखळीच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या कारने (क्र. जीए-07-एल-6333) दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर मदत करण्याऐवजी कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
या अपघातानंतर ठोकर देणाऱ्या कारचा व कारचालकाचा डिचोली पोलिसांनी सर्वत्र शोध सुरू केला. या शोधकार्यात सीसीटीव्ही कॅमेरा व इतर माध्यमांचा वापर करण्यात आला. या शोधकार्यात डिचोली पोलिसांनी बेळगाव येथील समीर मधुकर पाटील (31) याचा व त्याच्या कारचा शोध लावला व त्याला कारसह ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात 281, 107 (2) या कलमान्वये गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली.
या प्रकरणी उत्तर गोवा अधीक्षक अक्षत कौशल व डिचोली उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश गडेकर, उपनिरीक्षक रश्मी मातोणकर अधिक तपास करीत आहेत.