कारवारमधून सहा हल्लेखोरांना अटक

0
5

>> मांद्रेच्या माजी सरपंचांवरील हल्ल्याप्रकरणी उत्तर गोवा पोलिसांच्या विशेष तपास पथकाची कारवाई; हल्ल्याचे कारण अस्पष्ट

मांद्रेचे माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी कारवार (कर्नाटक) येथून 6 जणांना काल अटक करण्यात आली. उत्तर गोवा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने ही कारवाई केली. मात्र त्यांनी महेश कोनाडकर यांच्यावर हल्ला का केला आणि त्यामागील सूत्रधार कोण, याविषयी अद्याप कोणताही उलगडा झालेला नाही. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण 7 जणांना अटक केली आहे. आणखी काही जणांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय असून, त्यांनाही लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.

बुधवारी सकाळी कारमधून आलेल्या 5 बुरखाधारी व्यक्तींनी मांद्रेचे माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. ही घटना आस्कावाडा-मांद्रे येथील मठाजवळ घडली होती. कारमधून आलेल्या 5 बुरखाधारी हल्लेखोरांनी ‘तुका मायकल जाय’ अशी विचारणा करत थेट लोखंडी सळईने त्यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात कोनाडकर हे जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर कोनाडकर यांनी आरडाओरड केल्याने हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला होता. गेले दोन दिवस पोलीस त्यांचा शोध घेत होते; मात्र त्यांचा ठावठिकाणा लागू शकला नव्हता.

याचदरम्यान गुरुवारी मांद्रे पोलिसांनी महेश कोनाडकर यांच्यावरील हल्ला प्रकरणी कारमालक पुंडलिक हरिजन याला अटक केली होती, त्याचाही ह्या हल्ल्यात सहभाग होता. तसेच ह्या हल्ल्यात वापरलेली कार (क्र. जीए-08-के-5119) देखील मांद्रे पोलिसांनी जप्त केली होती.
या प्रकरणातील हल्लेखोरांच्या शोधासाठी उत्तर गोवा पोलिसांनी विशेष तपास पथक नेमले होते. त्या पथकाने धडक कारवाई करत कारवारमधून 6 संशयितांच्या मुसक्या आवळल्या.

विशेष तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक विशाल मांद्रेकर, हेड कॉन्स्टेबल नितीन नाईक, कॉन्स्टेबल नितेश मुळगावकर, राज परब, प्रणय गावस, रुपेश आसगावकर, अनिकेत सावंत, रमनीष मडकईकर आणि आणि तांत्रिक कर्मचारी हरिश पालयेकर यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल आणि पेडणेचे उपअधीक्षक आशिष शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक कुणाल नाईक आशिष शिरोडकर आणि मांद्रेचे पोलीस निरीक्षक नारायण चिमुलकर पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, या हल्ल्यात आणखी सहा जणांचा सहभाग असल्याची चर्चा मांद्रे परिसरात सुरू आहे. मात्र त्या हल्लेखोरांबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. ज्या दिवशी हल्ला झाला, त्यावेळी एकूण तीन दुचाकींवरून 2-2 माणसे मास्क घालून त्या रस्त्याच्या बाजूला तीन ठिकाणी थांबली होती आणि फोनवर चर्चा करत होती, असे समोर आले आहे.

अटकेतील संशयितांची नावे
माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी विश्वनाथ हरिजन (रा. जुने गोवे), सुरेश नाईक (रा. सुकुर-पर्वरी), साईराज गोवेकर (रा. मायणा-पिळर्ण), फ्रेंकी नादार (रा. सांताक्रूझ), मनीष हडफडकर (रा. चोडण) आणि उद्देश शेट्टी (रा. आल्तिनो-पणजी) अशी अटक केलेल्या सहा संशयितांची नावे आहेत.

हल्ल्याचे कारण काय?
5 बुरखाधारी हल्लेखोरांनी ‘तुका मायकल जाय’ अशी विचारणा करत थेट लोखंडी सळईने महेश कोनाडकर यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्याचा संबंध एका आमदाराशी जोडण्याचा प्रयत्न झाला होता; मात्र त्यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. शिवाय त्या आमदाराने गुरुवारी जखमी महेश कोनाडकर यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपूसही केली होती. त्यामुळे कोनाडकर यांच्यावर हल्ला करण्यामागील नेमके कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच ह्या हल्ल्यामागे सूत्रधार कोण आहे, याचा उलगडा होणे अद्याप बाकी आहे. अटक केलेल्या सहा संशयितांच्या पोलीस चौकशीत त्याविषयी ठोस माहिती समोर येण्याची शक्यता आहे.