- पंकज अरविंद सायनेकर
कर्माचे एक कारण आहे, ज्यामुळे दुःखाची उत्पत्ती होते आणि हेच आपल्याला टाळता आले पाहिजे. आणि हे कारण म्हणजे, कर्म आणि कर्ता याचे मिलन. कितपत सक्रियतेने कर्ता आपल्या कर्मामध्ये सहभागी झाला आहे त्यावर ठरते की कर्त्याला दुःख मिळणार की आनंद.
आयुष्यातील येणारे संकट, येणारे दुःख ओळखता आले पाहिजे. त्याचबरोबर, ते कसे टाळता येईल हेही जाणणे फार गरजेचे आहे. प्रत्येक कर्मापासून कर्मफल निर्माण होते (ते मग चांगले किंवा वाईट कोणतेही असू शकते)- हा जागतिक कर्मसिद्धांत आहे. भूतकाळातील आणि आत्ताच्या घडीला आपल्या हातून होणारे कर्म ही कर्माशयाच्या रूपात असून, त्याबद्दल आपण काहीच करू शकत नाही. ती कर्म आम्ही बदलू शकत नाही किंवा पूर्णपणे मिटवूही शकत नाही. त्याचबरोबर, त्या कर्मांना दुसर्या कर्माबरोबर पुनर्स्थितही करू शकत नाही. म्हणजे, प्रत्येक कर्मफल आपल्याला भोगावेच लागते. ते चांगले असो वा नसो. पण, जर का माणसाने जाणीवपूर्वक काम केले तर किंवा भविष्यकालीन कर्मांवर लक्ष दिले तर इच्छित कर्मफल साधू शकतो. उदाहरणार्थ; एका विद्यार्थ्याला पहिल्या दोन परीक्षांत कमी गुण मिळाले, आणि त्याच्या दैनंदिन नित्यक्रमात तो विशेष बदल करत नाही. हे त्याचे भूतकाळातील आणि वर्तमानातील कर्म झाले. आता, जर का परीक्षेत उत्तीर्ण होणार, तर ह्या विद्यार्थ्याने योग्य प्रकारे अभ्यास केला पाहिजे, ज्या सवयी वर्तमानात आहेत त्यामध्ये बदत केला पाहिजे, जेणेकरून भविष्यात येणारे संकट (दुःख) टाळले जाईल.
म्हणून महर्षी पुढील सूत्र सांगतात; ‘द्रष्टृदृश्ययोः संयोगो हेयहेतुः|’ (यो.द. २.१७) – ज्याचा अर्थ, भविष्यातील दुःख टाळण्यासाठी जो द्रष्टा (बघणारा) आणि दृश्य (जे काही दिसते ते) यांचा संयोग, संगम टाळला पाहिजे. महर्षींच्या म्हणण्यानुसार कर्माचे एक कारण आहे, ज्यामुळे दुःखाची उत्पत्ती होते आणि हेच आपल्याला टाळता आले पाहिजे. आणि हे कारण म्हणजे, कर्म आणि कर्ता याचे मिलन. कितपत सक्रियतेने कर्ता आपल्या कर्मामध्ये सहभागी झाला आहे त्यावर ठरते की कर्त्याला दुःख मिळणार की आनंद. (किंवा तो तटस्थ असेल) आणि ह्याच पद्धतीने श्रीकृष्णही अर्जुनाला सल्ला देतात…
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन|
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥ (भ.गी. २.४७)
तू तुझे नियत कर्म कर. तुझे नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे. तसेच तुझे कर्म न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस. जर का आसक्ती आली, तर प्रत्येक कर्माशी आपण जोडले जातो आणि एकतर राग (ओढ) किंवा द्वेष (घृणा) निर्माण होते. दुःख हे दोन प्रकारचे असू शकते, शारीरिक कष्ट, यातना; जे शारीरिक पातळीवर असते. किंवा मानसिक पातळीवर म्हणजे मानसिक क्लेश, यातना. वरील सूत्रात आम्हाला काही अंशी असे वाटते की, ‘ह्या जगात दुःख आहेत तरी का?’ परंतु, हा प्रश्न म्हणजे निव्वळ भ्रामक कल्पना असून हा प्रश्न कायमच अनुत्तरित राहतो. कारण प्रत्येक दिवशी नव्हे तर प्रत्येक क्षणी आपण नवी कर्म करतो ज्यामुळे दुःख (किंवा सुख) निर्माण होतच राहते.