काम युद्धपातळीवर, आज उशिरा पाणीपुरवठा

0
137

>> साबांखा मंत्री दीपक पाऊसकर यांची माहिती

>> सलग पाचव्या दिवशी पाण्याचे दुर्भिक्ष्य

राजधानी पणजीसह तिसवाडी तालुका आणि फोंडा तालुक्यातील काही भागातील नळ सलग पाचव्या दिवशी कोरडे असल्याने पाण्याचे मोठे दुर्भिक्ष निर्माण झाल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. टँकरद्वारे होणारा पाण्याचा पुरवठा अपुरा आहे. दरम्यान, केरये – खांडेपार येथे ९०० मिमी जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर जलवाहिनीतून पाणी पुरवठ्याला सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी काल दिली.

गेल्या गुरुवारी १५ ऑगस्ट रोजी तिसवाडी तालुक्याला पाण्याच्या पुरवठा करणार्‍या दोन प्रमुख जलवाहिन्या फुटल्याने पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे. नळ कोरडे पडल्याने नागरिक त्रस्त बनले आहेत. मंगळवारी दुपारपर्यंत जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठ्याला सुरुवात होणार असे सांगितले जात असले तरी सुरुवातीला जलवाहिनीतील पाण्याचा दाब कमी ठेवला जाणार असल्याने बुधवारी सर्वच भागात पाणी उपलब्ध होण्याबाबत अनिश्‍चितता व्यक्त केली जात आहे.
राजधानी पणजीसह तिसवाडी तालुक्यातील ताळगाव, सांताक्रुझ, सांतआंद्रे, कुंभारजुवा मतदारसंघातील विविध भागात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. टँकरद्वारे अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्याने आरोग्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पितळाला सुध्दा पाणी टंचाईचा मोठा फटका बसला आहे. हॉस्पिटलला टँकरद्वारे योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. हॉस्पितळाच्या स्वच्छतागृहात पाण्याअभावी अस्वच्छता निर्माण झाली आहे. आयसीयूच्या स्वच्छतागृहात अस्वच्छता निर्माण झाली आहे. हॉस्पिटलच्या प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी प्रयत्न चालविले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राजधानी पणजी शहराला ओपा खांडेपार येथून पाण्याचा पुरवठा होतो. पाणी पुरवठ्यासाठी चाळीस – पन्नास किलो मीटरपर्यंत जलवाहिनी घालण्यात आलेली आहे. ही जलवाहिनी एखाद्या भागात फुटल्यास पणजीला पर्यायी पाणी पुरवठ्याबाबत कोणतेही तरतूद नसल्याने मागील पाच दिवस पणजीवासियांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तिसवाडी तालुक्यामध्ये पर्यायी पाणी पुरवठ्याबाबत व्यवस्था करण्याची नितांत गरज आहे.

सुदिन ढवळीकरांकडून पाहणी
माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी काल केली. राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करताना नवीन मुख्य जलवाहिनी डोंगराळ भागातून घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या डिसेंबरपूर्वी जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामाचा आदेश ठेकेदाराला देण्यात आला होता. परंतु, ठेकेदाराने जलवाहिनी डोंगराळ भागातून घालण्याच्या कामाला सुरुवात केली नाही, असे आमदार ढवळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

खांडेपार प्रकरणाची चौकशी करणार
केरये – खांडेपार येथील जलवाहिनी फुटण्याच्या प्रकाराची चौकशी केली जाणार आहे. बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडलेली आहे. आगामी काळात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये म्हणून आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे, असेही बांधकाम मंत्री पाऊसकर यांनी सांगितले. राज्यातील सर्व तालुक्यांना पर्यायी पाण्याचा पुरवठ्याची व्यवस्था करण्यावर विचार करून योग्य निर्णय घेतला जाणार आहे, असेही मंत्री पाऊसकर यांनी सांगितले.

केरये – खांडेपार येथे फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सुरुवातीला ९०० मिमी जलवाहिनीचे काम हाती घेण्यात आले आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम दिवस-रात्र केले जात आहे.