कामुर्ली कोमुनिदाद बैठकीत सनबर्नला विरोध

0
6

कामुर्ली कोमुनिदादच्या बैठकीत कामुर्ली येथे सनबर्न संगीत महोत्सवाचे आयोजन करू देण्यासाठीचा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला. कामुर्ली कोमुनिदादची बैठक काल रवािरी कामुर्ली पंचायत सभागृहात संपन्न झाली. कामुर्ली कोमुनिदादच्या 198 गावकऱ्यांपैकी 68 गावकरी यावेळी बैठकीला उपस्थित होते. ही बैठक काल बंद दरवाजाआड झाली. यंदाच नव्हे तर येत्या पाच वर्षांपर्यंत कामुर्ली कोमुनिदादच्या जागेत सनबर्न महोत्सव होऊ द्यायचा नाही असा ठराव यावेळी बैठकीत घेण्यात आला.

कामुर्ली येथील कोमुनदाद जमिनीत यंदा सनबर्न नृत्य आणि संगीत महोत्सव आयोजित करण्यासाठीचा प्रस्ताव गोवा कोमुनिदादच्या कार्यालयात पाठवला होता.
यंदा सनबर्न महोत्सव दक्षिण गोव्यात आयोजित करण्यासाठी आयोजकांनी प्रयत्न सुरू केल्यानंतर त्याला दक्षिण गोव्यातून जोरदार विरोध सुरू झाला. संबंधित कंपनी वेर्णा येथे हा महोत्सव आयोजित करण्यासाठी हालचाली करत होती. त्यानंतर त्याला स्थानिकांनी जोरदार विरोध केला. त्यानंतर कुडतरीचे आमदार व औद्योगिक विसाक महामंडळाचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स तसेच मंत्री माविन गुदिन्हो यांनी दक्षिण गोव्यात सनबर्न नको अशी भूमिका घेत मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली होती. त्यामुळे आता परत हा संगीत महोत्सव उत्तर गोव्यातच आयोजित करण्यासाठी सदर कंपनीने प्रयत्न सुरू केलेल आहेत.