गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदार दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांच्याविरोधात दाखल केलेली अपात्रता याचिका गोवा विधानसभेच्या सभापतींनी मान्य केली आहे. पाटकर यांची याचिका फेटळण्याची विनंती कामत आणि लोबो या द्वयींनी केली होती. त्यामुळे पहिल्या टप्प्यात त्यांना एक झटका बसला आहे.
आमदार कामत आणि लोबो यांनी कॉँग्रेसचे अमित पाटकर यांच्या अपात्रता याचिकेला आक्षेप घेऊन ती फेटाळून लावण्याची विनंती सभापतींकडे केली होती. पाटकर हे सभागृहाचे सदस्य नसल्याने आमदार अपात्रता प्रकरणी याचिका दाखल करू शकत नाही, असा दावा आमदार कामत आणि लोबो यांनी केला होता.
सर्वोच्च न्यायालयाचा एका याचिकेतील निवाड्याचा हवाला देऊन कोणतीही इच्छुक व्यक्ती अपात्रता याचिका दाखल करू शकते, असा दावा पाटकर यांच्यावतीने करण्यात आला होता. सभापतींनी पाटकर यांनी केलेल्या दाव्याशी सहमती दर्शविली आहे. कोणत्याही इच्छुक व्यक्तीला भारतीय राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीनुसार अपात्रता याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे आणि त्यानुसार, दोन आमदारांनी दाखल केलेला अर्ज फेटाळण्यात येत आहे. आता, हे अपात्रता प्रकरण गुणवत्तेवर घेण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले आहे.