रायबंदर येथील मलनिस्सारण वाहिनी घालताना झालेल्या दुर्घटनेत कामगाराच्या मृत्यू प्रकरणी जुने गोवे पोलिसांनी कंत्राटदार मणिकंदन सिरांगन आणि पर्यवेक्षक निशांत कुमार मुथुरामन यांना काल अटक केली.
रायबंदर येथे मलनिस्सारण वाहिनी घालताना सोमवारी झालेल्या दुर्घटनेमध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला होता, तर एक कामगार जखमी झाला होता. या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी स्मार्ट सिटीच्या मलनिस्सारण वाहिनीचे काम करणारा कंत्राटदार आणि पर्यवेक्षकाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना करण्यात आली नाही, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत कंत्राटदार, पर्यवेक्षकाने मजुरांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा केल्याचे आढळून आले. कामाच्या ठिकाणी सुरक्षेची कोणतीही खबरदारी घेण्यात आली नाही. या प्रकरणी पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वॅरोनिका कुतिन्हो तपास करीत आहेत.