मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन
राज्यातील कामगार संघटना, कामगारांनी आपल्या मागण्या, प्रश्न सोडविण्यासाठी निदर्शने करण्याऐवजी सरकारशी थेट संवाद साधून चर्चेच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडवून घेतले पाहिजेत. राज्य सरकार कामगारांच्या खऱ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि त्यांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल कामगार खाते आणि दिशा फाऊंडेशन यांनी संयुक्त विद्यमाने कामगार दिनानिमित्त आयोजित श्रम गौरव पुरस्कार सोहळ्यात बोलताना येथ केले.
राज्य सरकार खासगी क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी वचनबद्ध आहे. औषधनिर्मिती, हॉटेल किंवा इतर खासगी आस्थापनांतील कामगारांचे शोषण खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिला.
राज्य सरकारकडून राज्यातील खासगी क्षेत्रातील कामगारांना गृहकर्ज, भविष्य निर्वाह निधी, वैद्यकीय (ईएसआय) आणि इतर योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील बांधकाम कामगार कल्याण निधीत 230 कोटी रुपये उपलब्ध असून, इतर क्षेत्रांतील कामगारांसाठी स्वतंत्र निधी स्थापन करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.
कामगारविषय योजनेत व्यापक सुधारणार
राज्यातील कामगारविषयक योजनेत लवकरच व्यापक सुधारणा करून अधिकाधिक कामगारांपर्यंत लाभ पोहोचविण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. मुळगाव डिचोली येथे उभारण्यात येत असलेल्या ईएसआय इस्पितळ, सांगे येथे ईएसआय इस्पितळासाठी प्रयत्न केले जात आहेत. ईएसआय योजनेंतर्गत कामगारांना 20 लाखांपर्यंत उपचाराची सुविधा मिळू शकते, त्यामुळे कामगारांना खासगी इस्पितळाच्या खर्चापासून दिलासा मिळू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
ई-श्रम कार्ड अनिवार्य
बांधकाम कामगारांनी तीन महिने काम केले असल्यास हाउसिंग योजनेचा लाभ मिळवता येतो. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी ‘ई-श्रम कार्ड’ अनिवार्य करण्यात आले आहे. अपघाताच्या स्थितीत त्याअंतर्गत आर्थिक मदतीची तरतूद आहे. आयडीसी क्षेत्रांत काम करणाऱ्या कामगारांसाठी लवकरच बससेवा सुरू करण्यात येणार असून, वेर्णा औद्योगिक वसाहतीत महिला कामगारांसाठी वसतिगृहांची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या अनेक खात्यात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत सामावून घेण्यावर विचार केला जात आहे. राज्यातील तरुणांनी प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन या सारख्या क्षेत्रांत कंत्राटदार म्हणून स्वतःची कामे सुरू करावीत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले. यावेळी मजूर आयुक्त डेरिक नेटो व इतरांची उपस्थिती होती.