>> राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर
>> वीज, मच्छीमार, शिक्षण तूर्त मुख्यमंत्र्यांकडेच
राज्य मंत्रिमंडळाचे बहुचर्चित खाते वाटप काल रविवारी झाले. खाते वाटपाला विलंब झाल्याने तो गोवाभर चर्चेचा विषय ठरला होता. काल प्रशासनाच्यावतीने सचिव श्रीपाद आर्लेकर यांनी जारी केलेल्या पत्रकाद्वारे मंत्र्यांच्या खातेवाटपाविषयीची सविस्तर माहिती दिली. अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गृह व अर्थ ही दोन महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवली आहेत. सार्वजनिक बांधकाम हे महत्त्वाचे खाते नीलेश काब्राल यांच्याकडे देण्यात आले आहे. तसेच विश्वजित राणे यांच्याकडे एकूण पाच खात्यांचा कारभार सोपवण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांकडे गृह व अर्थखात्याबरोबरच अन्य काही खाती जी कुणालाही देण्यात आलेली नाहीत ती खातीही सध्या तरी मुख्यमंत्र्याकडेच राहणार आहेत.
राज्यमंत्री मंडळातील क्रमांक दोनचे मंत्री असलेल्या विश्वजित राणे यांच्या वाट्याला एकूण पाच खाती आलेली असून त्यापैकी चार खाती ही अत्यंत महत्त्वाची अशी खाती आहेत. त्यात नगर आणि नियोजन खाते, नगर विकास खाते, वन खाते तसेच मागच्यावेळी त्यांच्याकडे असलेल्या आरोग्य तसेच महिला आणि बाल कल्याण खाते ह्या खात्यांचा समावेश आहे.
माविन गुदिन्हो यांना मागच्यावेळी त्यांच्याकडे असलेली तीन खाती पुन्हा देण्यात आली असून त्यात वाहतूक, शिष्टाचार आणि पंचायत या खात्यांचा समावेश आहे. ह्या तीन खात्यांबरोबरच यंदा त्यांना उद्योग हे एक महत्त्वाचे खाते देण्यात आले आहे. रवी नाईक यांना कृषी खाते, हस्तकला आणि नागरी पुरवठा ही तीन खाती देण्यात आली आहेत. नीलेश काब्राल यांना सार्वजनिक बांधकाम खाते हे एक अत्यंत वजनदार असे खाते देण्यात आले आहे. त्याचबरोबर मागच्यावेळी त्यांच्याकडे असलेले पर्यावरण तसेच कायदा व न्याय ही खातीही त्यांना देण्यात आलेली आहेत. मात्र, मागच्यावेळी त्यांच्याकडे असलेले वीज हे महत्त्वाचे खाते मात्र यावेळी त्यांना देण्यात आलेले नाही. सार्वजनिक बांधकाम खाते हे मागच्यावेळी सुदिन ढवळीकर हे मंत्रिमंडळात असताना त्यांच्याकडे होते. मात्र, नंतर त्यांना मंत्रिमंडळातून वगळून दीपक पाऊस्कर यांना मंत्री केल्यानंतर ते खाते त्यांना देण्यात आले होते. सुभाष शिरोडकर यांना जलसंसाधन, सहकार व प्रोव्हेदोरिया ही खाती देण्यात आली आहेत. रोहन खंवटे यांना पर्यटन हे महत्त्वाचे खाते देण्यात आले असून त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान तसेच प्रिंटिंग आणि स्टेशनरी ही खाती देण्यात आली आहेत.
गोविंद गावडे यांना मागच्यावेळी होते तेच म्हणजे कला आणि संस्कृती खाते तसेच क्रीडा हे महत्त्वाचे खाते व ग्रामीण विकास हे खाते देण्यात आले आहे.
बाबूश मोन्सेरात यांना महसूल, कामगार व कचरा व्यवस्थापन ही खाती देण्यात आली आहेत. मागील मंत्रिमंडळात महसूल व कामगार ही खाती त्यांच्या पत्नी जेनिफर यांच्याकडे सोपवण्यात आली होती.
मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार
राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून त्यावेळी रिक्त असलेली तीन मंत्रिपदे भरण्यात येणार आहेत. त्या मंत्र्यांसाठीही काही खाती राखून ठेवण्यात आलेली आहेत. रिक्त असलेल्या महत्त्वाच्या खात्यांमध्ये वीज, मच्छीमारी, शिक्षण, समाज कल्याण, तसेच नदी परिवहन, गृहनिर्माण, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच खाण आदी खात्यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री डॉ.सावंत यांनी मागच्यावेळी खाण, शिक्षण तसेच कार्मिक ही खाती स्वतःकडे ठेवली होती.
ज्येष्ठतेनुसार मंत्रिपदे : तानावडे
आम्ही ज्येष्ठतेनुसार आमदारांना मंत्रिपदे दिली आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि आणखी तीन मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे. मात्र अजून मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली नसल्याचे काल प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी स्पष्ट केले.
हा विस्तार कधी होणार आहे हे आताच सांगता येणार नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे याबाबत पक्षश्रेष्ठी व केंद्रीय नेत्यांशी चर्चा करून योग्य काय तो निर्णय घेणार असल्याचे तानावडे यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले.
मंत्रिपद मिळाले नसल्याने काही भाजप आमदार हे नाराज आहेत. त्याविषयी काय सांगाल, असे विचारले असता तानावडे म्हणाले की आम्ही ज्येष्ठतेनुसार आमदारांना मंत्रिपदे दिलेली आहेत. सगळ्याच आमदारांना आपण मंत्री व्हावे असे वाटत असते. पण पक्ष सगळ्याच आमदारांना काही मंत्रिपदे देऊ शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.