>> १३ अमेरिकन कर्मचार्यांसह १५० हून जास्त जखमी
गुरुवारी काबूल विमानतळावर झालेल्या दोन आत्मघाती स्फोटांंतील मृतांची संख्या १०५ झाली असून यात १५० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये १३ अमेरिकी कर्मचार्यांचा समावेश असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने त्याची जबाबदारी घेतली आहे. गुरुवारी काबूल विमानतळाजवळ झालेल्या या बॉम्बस्फोटांमध्ये ठार झालेल्या १०५ पैकी १३ अमेरिकी कर्मचार्यांचा समावेश आहे. ठार झालेले उर्वरित लोक अफगाण नागरिक असल्याचा अंदाज आहे. बॉम्बस्फोटात जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमेरिकन अधिकार्यांनी १८ हून अधिक अमेरिकन लष्करी कर्मचारी जखमी झाले आहेत आणि संख्या वाढू शकते अशी माहिती दिली आहे.
पाकिस्तानमध्ये रचला कट?
या आत्मघाती हल्ल्यानंतर पाकिस्तानभोवती संशयाचे वलय तयार झाले आहे. तालिबान, अमेरिका आणि अफगाण सरकार दरम्यान झालेल्या शांतता चर्चेदरम्यान अनेकांची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. त्यात काही कुख्यात दहशतवाद्यांचा समावेश आहे. त्यातील काही दहशतवाद्यांनी काबूल विमानतळावर हल्ला केला असावा असे म्हटले जात आहे. यामध्ये पाकिस्तान आयएसआयएसचा चेहरा असलेला अमीर मावलावी अब्दुला फारूखीचाही समावेश आहे. फारूखी हा याआधी गुरुद्वारावर झालेल्या हल्ल्यातही सहभागी होता. या हल्ल्याचा कट पाकिस्तानने रचला असल्याची कबुली त्याने दिली होती. फारुखी याआधी लष्कर-ए-तोयबामध्ये सहभागी होता. त्यानंतर तो पाकिस्तानमधील तहरिक-ए-तालिबानमध्ये सामिल झाला. त्यामुळेच या हल्ल्याचा कटदेखील मावलावी आणि त्याच्या जुन्या सहकार्यांनी मिळून रचला असावा, असा संशय असल्याचे भारतीय गुप्तचर संस्थेच्या सूत्रांनी सांगितले.
अमेरिकेचा इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी, आयएसआयएस दहशतवादी विजयी होणार नाहीत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत अमेरिकन नागरिकांना आणि इतरांना अफगाणिस्तानमधून बाहेर काढणार. आमची मोहीम सुरूच राहणार आहे. या भ्याड हल्ल्यांना अमेरिका घाबरणार नसून आम्ही दहशतवाद्यांना शोधणार आणि त्यांचा खात्मा करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, तालिबाननेही या हल्ल्यात आमचे २८ जण ठार झाले असल्याचे म्हटले आहे.
हल्लेखोराचे छायाचित्र
काबूल विमानतळावर गुरूवारी स्फोट घडवलेल्या दहशतवाद्याचे छायाचित्र आयसीसकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. या छायाचित्रात दिसणार्या दहशतवाद्याचे नाव अब्दुल रहमान अल-लोगरी असून त्याच्या तोंडावर काळे कापड गुंडाळलेले दिसत आहे. त्याच्या छातीवर बंदूक लावलेली दिसत आहे. तो इस्लामिक स्टेटच्या झेंड्यापुढे उभा आहे.
अमेरिकन सैनिक लक्ष्य
अमेरिकी सैनिकांना लक्ष्य करणे हाच या हल्ल्यामागचा मुख्य उद्देश होता. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सध्या अमेरिकेच्या ताब्यात असून अफगाणिस्तानमधील एकूण ४ आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी ३ विमानतळांवर अगोदरच तालिबानने ताबा मिळवला आहे. काबूल विमानतळावर तैनात असणारे अमेरिकी सैनिक नागरिकांचा पासपोर्ट, व्हिसा आणि इतर कागदपत्रे तपासून त्यांना आत सोडण्याच्या तयारीत होते. हा दहशतवादी अमेरिकी सैनिकांपासून ५ मीटर अंतरावर पोहोचला. तिथे त्याने बॉम्बस्फोट केला.