काणकोण पालिकेच्या माहिती पुस्तिकेचे अनावरण

0
140

काणकोण (न. प्र.)
काणकोण नगरपालिकेने माझे घर माझे शहर या योजनेतर्गत पालिका क्षेत्र स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक घरापर्यंत खास पत्रकांचे वितरण करण्यासाठी माहिती पुस्तिका तयार केली आहे. या माहिती पुस्तिकेचे अनावरण नुकतेच नगराध्यक्षाच्या कक्षात करण्यात आले आहे. यावेळी नगराध्यक्षा छाया कोमरपंत, उपनगराध्यक्ष श्यामसुंदर देसाई, मुख्याधिकारी राजू देसाई, सर्व नगरसेवक, घन कचरा व्यवस्थापन मंडळाच्या सीमा आर. एन., बिगर सरकारी यंत्रणेचे कार्यकर्ते उपस्थित होते. या योजनेअंतर्गत प्रत्येक घरांना चार कचरा कुंड्या दिल्या जातील. ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळ्या कचरा कुंडीत टाकावयाचा असून दररोज पालिकेचे कर्मचारी कचरा गोळा करणार आहेत.
या माहिती पत्रकात घन कचरा, रिसायकलींग साहित्य, सुका कचरा, ओला कचरा याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पालिका क्षेत्र पूर्णपणे प्लास्टिक मुक्त करणार येणार असून जो कोणी नियमभंग करेल त्याला दंड देण्यात येणार असल्याचे यावेळी मुख्याधिकारी राजू देसाई यांनी स्पष्ट केले.
पोलीस कारवाईचा इशारा
काणकोण पालिका क्षेत्रात अजूनही निर्जन स्थळी काही लोक गपचूप कचरा टाकून जातात. अशा व्यक्तीचे छायाचित्रीकरण करण्यात येत असून त्याची माहिती काणकोण पोलीस स्थानकावर दिली जाणार आहे. त्यामुळे पोलीस त्यांच्यावर कारवाई करतील, अशी माहिती नगरसेवक दिवाकर पागी यांनी दिली. आतापर्यंत काणकोण पोलीस स्थानकाने दोन हजारांपेक्षा अधिक घटनांची नोंद केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी दिली.
आठवडा बाजारात अद्यापही प्लास्टिक
चावडीवरील आठवडा बाजारात अजूनही प्लास्टिक वापर केला जात आहे. काणकोणच्या गोंयकार या संघटनेने सर्व पंचायतीमध्ये आतापर्यंत तीन हजार इतक्या कापडी पिशव्यांचे वितरण केले आहे. काही स्वयं साहाय्य संघटनादेखील कापडी पिशव्या पुरवित आहेत. मात्र नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत यावेळी सर्वांनीच व्यक्त केले. त्यामुळे यापुढेे पालिका क्षेत्रातील सर्व शाळा, उच्च माध्यमिक विद्यालये, महाविद्यालये, चर्च, देवस्थान या ठिकाणी त्याचबरोबर परप्रांतीय कामगारांना माहिती पुरविण्याची व्यवस्था पालिका करणार असल्याचे उपनगरध्यक्ष श्यामसुंदर देसाई यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर पालिका क्षेत्रातील सर्व व्यापारी, किनारपट्टीतील शॅक्स चालक, हॉटेल, खाणावळी चालक, फळ भाजी विक्रेते यांची लवकरच बैठक बोलावून या संबंधीची माहिती दिली जाईल असे पालिका निरीक्षक नम्रता देसाई यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर काणकोणची गोंयकार ही संघटना यापुढे राष्ट्रीय महामार्ग सफाईचे काम हातात घेणार असल्याचे या संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.
देखरेख समितीची निवड
या सर्व गोष्टीवर देखरेख ठेवण्यासाठी मुख्याधिकारी राजू देसाई, घन कचरा व्यवस्थापन मंडळाच्या व्यवस्थापिका सीमा आर. एन., पालिका अभियंता विनोद कोठारकर, पालिका निरीक्षक नम्रता देसाई, पर्यवेक्षक कृष्णा देसाई यांची विशेष समिती निवडण्यात आली आहे. त्या शिवाय नगरसेवक दिवाकर पागी यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आलेल्या कचरा व्यवस्थापन समितीवर नगराध्यक्षा छाया कोमरपंत, उपनगराध्यक्ष शामसुंदर देसाई, नगरसेवक हेमंत ना. गावकर, किशोर शेट, प्रार्थना ना. गावकर, समीता धुरी, मारुती कोमरपंत, नीतू देसाई, दयानंद पागी, यांचा समावेश आहे.
दुमाणे प्रकल्प लवकरच कार्यान्वित
दुमाणे येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याठिकाणी छप्पर तयार झाली आहे. शिवाय अतिरिक्त जमिनीसाठी भूसंपादन प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. ज्या कामगारांना ऑक्टोबरपर्यंत आदेश दिला आहे. त्या सर्व कामगारांच्य नियुक्तीचे सर्वेक्षण करुन त्यांना नव्याने आदेश देण्याच्या दृष्टीने आतापासूनच विचार चालू असल्याची माहिती मुख्याधिकारी राजू देसाई यांनी दिली. काणकोण तालुक्यातील खोतीगाव आणि खोला पंचायत सोडल्यास अन्य पंचायती गंभीरपणे कचरा विल्हेवाटीकडे लक्ष देत नसल्याचे सीमा आर. एन यांनी सांगितले. बैठकीचे संचालन पालिका निरीक्षक नम्रता देसाई यांनी केले.