काणकोण तालुक्यात जुलूसला परवानगी नको

0
8

>> हिंदू संघटनांकडून उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर; परप्रांतीयांकडून धार्मिक कलह निर्माण करण्याचा प्रयत्न

काणकोण तालुक्यात श्रीस्थळचे श्री मल्लिकार्जुन देवस्थान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मिरवणुकीशिवाय अन्य कोणत्याच मिरवणुका काढल्या जात नाहीत. या तालुक्यात सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बाहेरच्या माणसांना जुलूससाठी परवानगी देऊ नये, अशी मागणी करीत काणकोणातील हिंदू संघटनांचे प्रतिनिधी काल काणकोणच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयाजवळ एकवटले.

कोणत्याही परिस्थितीत जुलूस काढायला परवानगी देऊ नये, अशी मागणी करणारे लेखी निवेदन सर्व संघटनांच्या वतीने हिंदवी स्वराज्य या संघटनेने काणकोणचे मामलेदार मनोज कोरगावकर यांना सादर केले. काणकोणचे उपजिल्हाधिकारी प्रशिक्षणासाठी गोव्याबाहेर असल्यामुळे त्यांच्या उपस्थितीत कोरगावकर यांनी सदर निवेदन स्वीकारले. ह्या निवेदनावर जवळजवळ 60 प्रमुख नागरिकांच्या सह्या आहेत. काल काणकोणच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयाजवळ तालुक्यातील विविध भागांबरोबरच मडगाव, कुंकळ्ळी भागातून 500 पेक्षा अधिक हिंदूप्रेमी एकवटले होते. यापूर्वी दोन वेळा जुलूससाठी परवानगी मागण्यात आली होती, ती मागणी उपजिल्हाधिकाऱ्यांनी कायदा आणि सुव्यस्थेचा विचार करून परवानगी नाकारली होती. मात्र गोव्यातील कोणातरी उच्चपदस्थांच्या आशीर्वादामुळे वारंवार परवानगी मागण्याचे धाडस होत आहे. गोव्याबाहेरून व्यवसायासाठी आलेल्या काही व्यक्ती काणकोणातील धार्मिक सलोखा बिघडविण्याचे काम करीत आहेत, असे हिंदू संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी सांगितले.

यावेळी सम्राट भगत, खोतीगावचे सरपंच आनंदू देसाई, गावडोंगरीचे सरपंच धिलोन देसाई, स्वामी नरेंद्र संप्रदायाचे लक्ष्मण शेट, माजी नगराध्यक्ष रत्नाकर धुरी, संतोष ना. गावकर, बजरंग दलाचे विराज देसाई, श्री मल्लिकार्जुन देवस्थानचे प्रमोद ना. गावकर, लोलयेच्या श्री दामोदर विद्यालयाचे मुख्याध्यापक जितेंद्र आमशेकर, श्री दामोदर देवस्थानचे प्रमोद प्रभुदेसाई, गोरक्षाचे राजू झा, नगरसेवक शुभम कोमरपंत, ज्योती पैंगीणकर, सूरज गावकर, भाजप मंडळाचे अध्यक्ष विशाल देसाई, श्री सिद्धीविनायक देवस्थान आगोंदचे शरद देसाई, तुळशीदास कामत यांनी अत्यंत जहाल शब्दांत आपली मते मांडली.