काणकोणात ५ हजार लोकांचे ऐतिहासिक एकत्रित समूहगान

0
154

देळे, काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या ‘राष्ट्र एकताकी आवाज’ या कार्यक्रमाला काणकोणवासीयांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. चावडीवरील श्री मल्लिकार्जुन देवास्थानच्या मैदानावर आयोजित या ऐतिहासिक अशा कार्यक्रमात काणकोण तालुक्यातील शाळा, उच्च माध्यमिक विद्यालये, महाविद्यालये, अंगणवाडी सेविका, महिला मंडळ, स्वयंसहाय्य गट, विविध सांस्कृतिक संस्था आणि क्रीडा संस्थांचे प्रतिनिधी मिळून ५ हजारपेक्षा अधिक जणांनी ‘एक सूर एक ताल’ ही गीते एकाच आवाजत सादर केली. डोळयाचे पारणे फिटणार्‍या या आगळ्या वेगळया कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन डॉ. पूर्णानंद च्यारी यांनी केले.

गोवा कला आणि संस्कृती संचालनालयाने या उपक्रमाला आर्थिक पाठबळ दिले होते. संपूर्ण परिसर तिरंगी रंगाने भरून गेला होता. खास मिलीटरी बँडमुळे या कार्यक्रमाला वेगळे आकर्षण निर्माण केले होते. भव्य असा रंगमंच, नेपत्रदीपक प्रकाश योजना आणि ध्वनीयोजना या सर्वांचीच अनुभूती काणकोणवासीय पहिल्यांदाच घेत होते. या कार्यक्रमाची पहिली फेरी २४ रोजी झाली त्यावेळी काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस, माजी आमदार विजय पै खोत, नगराध्यक्षा प्रार्थना ना. गावकर, ज्ञान प्रबोधिनी मंडळाचे अध्यक्ष रामदास माजाळीकर, आयोजन समितीचे अध्यक्ष राजेंद्र देसाई, दया पागी, जनार्दन भंडारी, पुष्पा अय्या, भाजपाचे मंडळ प्रमुख महेश नाईक, सर्व पंचायतींचे सरपंच, नगरसेवक, विविध समित्यांचे प्रमुख या सर्वांचा स्मृतिचिन्हे देऊन खास गौैरव करण्यात आला.

यावेळी काणकोण, पैंगीणचे बालभवन केंद्र, कात्यायणी बाणेश्‍वर विद्यालय, मल्लिकार्जुन विद्यालय, क्षत्रिय कोमरपंत समाज, विठ्ठल रखुमाई मंदिर, तुडल हायस्कूल, व्हाईस आफ गोवा यांनी देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित नृत्य तर अश्‍वेक शानभाग, प्रीता वेळीप, स्नेहा कोमरपंत, रिया कुतीन्हो, विश्‍वप्रताप पवार, कृतीना, मिशे, रोहित यांनी राष्ट्रीय एकात्मतेवर गीते सादर केली होती. या कार्यक्रमाचे संचालन प्रसाद पागी आणि योगिता वेर्णेकर यांनी केले. यावेळी बोलताना आयोजन समितीचे कौतुक करून राजकारणात येऊ पहाणार्‍यांनी तीन महिने देशाची सेवा करावी आणि ती व्यक्ती सुशिक्षित असायला हवी असे मत व्यक्त केले. यावेळी विजय पै खोत, प्रार्थना ना. गावकर यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रमदा देसाई यांनी, प्राचार्य डॉ. एफ. एम. नदाफ यांनी स्वागत तर आयोजन समितीचे सचिव रामदास सावंत यांनी आभार मानले.

२५ रोजीच्या ‘एक सूर एक ताल’ या खास आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा कार्यक्रमाला कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, दक्षिण गोव्याचे खासदार ऍड. नरेंद्र सावईकर, आजी माजी आमदार, नगराध्यक्षा, नगरसेवक, सर्व पंचायतींचे सरपंच, जिल्हा पंचायत सदस्य, विविध शाळांचे मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम केवळ काणकोण तालुका आणि राज्यापुरता मर्यादित नसून खर्‍या अर्थाने राष्ट्रीय स्तरावरील योग्यतेचा असल्याचे मत आमंत्रितांनी यावेळी करून कार्यक्रमात सहभागी झालेल्यांचा मुक्त कंठाने गौरव केला.

यावेळी प्राचार्य एफ. नदाफ यांनी स्वागत केल्यानंतर मंत्री गोविंद गावडे, खासदार ऍड. नरेंद्र सावईकर, आमदार इजिदोर फर्नांडिस, विजय पै खोत, प्रार्थना ना. गावकर, लष्कराचे कमांडट अरूण शेजवा, रामदास माजाळीकर यांची भाषणे झाली. आयोजन समितीचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी स्वागत केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन डॉ. पूर्णानंद च्यारी यांनी केले. यावेळी महाविद्यालयाच्या पथकाने राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित बहारदार कार्यक्रम सादर केला. त्यानंतर भरतनाट्यम्, बालभवन, मल्लिकार्जुन विद्यालय, आकार या पथकांची नृत्ये आणि उर्जा ना. गावकर, अश्‍वेक शानभाग, विश्‍वप्रताप पवार, प्रवीण गावकर, हेमा नाईक यांनी गीते सादर केली.

डॉ. पूर्णानंद च्यारी यांनी संगीतबद्ध केलेली एक सूर एक ताल वर आधारित हिंद देश के निवासी, अमुचा देश महान, विंगड रंगाचा आणि भारतीय प्रतिज्ञा या उपक्रमात सहभागी झालेल्यांनी सामूहिकरित्या सादर केली. कला संस्कृती खात्याचे संगीत शिक्षक, बालभवन, त्याचप्रमाणे काणकोण तालुक्यातील भजनी कलाकार, अन्य साथी कलाकारांनी या समूह गानात भाग घेतला होता. महाविद्यालयाचे व्यवस्थापन मंडळ, कर्मचारी वर्ग, माजी विद्यार्थी, विविध राजकीय पक्षांचे नेते, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात योगदान दिलेले काणकोणचे ज्येष्ठ कलाकार, आणि नागरिक, त्याचप्रमाणे, पोलीस, वाहतूक, मामलेदार, उपजिल्हाधिकारी, काणकोण नगरपालिका, शिक्षण खाते, वीज, पाणीपुरवठा खात्याच्या कर्मचार्‍यांनी या इतिहासात नोंद होणार्‍या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी झोकून दिले होते.