काणकोणच्या उमेदवारीस विलंब हा निष्ठावंतांचा अपमान ः तवडकर

0
82

गेल्या दहा वर्षांपासून काणकोण मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असताना २०१७ च्या निवडणुकीत या पक्षाचा उमेदवार जाहीर करायला उशिर करून एका प्रकारे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा अपमान करण्यात आलेला आहे, तरीदेखील पक्षाच्या कार्यकर्त्यांना अभिप्रेत असलेलाच उमेदवार मिळेल असे सांगून पक्षश्रेष्ठींविषयी आपल्याला पूर्ण विश्‍वास असल्याचे क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी भाजप कार्यालयाजवळ घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल सांगितले. काणकोण मतदारसंघातील भाजपची उमेदवारी जाहीर करायला झालेल्या उशिराबद्दल गोंधळलेले भाजप मंडळ, महिला मोर्चा आणि युवक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाजवळ हजेरी लावून श्री. तवडकर यांना समर्थन दर्शविले. शक्ती प्रदर्शनाने वातावरणही या ठिकाणी निर्माण झाले होते. संघटनशक्ती आणि विकासाच्या बळावर दहा दिवसांत संपूर्ण मतदारसंघातील एकत्रित करण्याच ताकद आपल्या कार्यकर्त्यांमध्ये असून काही विरोधी शक्तींनी नाहक बदनामी करून पक्षश्रेष्ठींचे कान भरण्याचे काम केले असल्याचा आरोप श्री. तवडकर यांनी यावेळी केला.

यावेळी भाजप मंडळ समितीचे माजी अध्यक्ष महेश वारीक यांनी, तीन वेळा पराभूत झालेल्या व्यक्तीला कॉंग्रेस पक्ष उमेदवारी देतो तर भाजप मात्र तीन वेळा विजयी झालेल्या उमेदवाराला ताटकळत ठेवतो असा टोला हाणला.