- वेंडेल रॉड्रिक्स
जागतिक कीर्तीचे गोमंतकीय फॅशन डिझायनर वेंडेल रॉड्रिक्स यांचे नुकतेच कोलवाळच्या त्यांच्या ‘काझा डोना मारिया’ या राहत्या घरी निधन झाले. आपल्या ‘द ग्रीन रूम’ या आत्मचरित्रात त्यांनी आपल्या या कोलवाळच्या घराच्या आठवणी लिहिल्या आहेत. त्या वेधक प्रकरणाचा श्री. परेश प्रभू यांनी केलेला हा अनुवाद पुस्तकाच्या प्रकाशकांच्या सौजन्याने..
मे १९९३.
सकाळी ८.३० वाजता टेलिफोन वाजला. मी बाहेर जायला निघालो होतो.
‘हॅलो’, पलीकडून काहीसा ब्रिटिश उच्चारातील स्वर ऐकू आला.
‘मी वेंडेल रॉड्रिक्सशी बोलू शकते का?’
‘मी वेंडेल. कोण बोलतंय?’
‘ओह, हॅलो, वेंडेल, मी मार्गारेट. ऑलिंडा ब्रागांझाची मुलगी.
मी लंडनहून बोलतेय.’
मी थक्क झालो. ऑलिंडा ब्रागांझा कोलवाळमध्ये राहायच्या.
१९८५ साली, मी मस्कतमध्ये होतो तेव्हा मला एकदा स्वप्न पडले होते की मी ब्रागांझांच्या घरात फिरतोय. मी ते घर कधीच पाहिलेले नव्हते. आम्ही मुलं त्या घराच्या उंच कुंपणातून आत डोकावतोय असं स्वप्न. त्यात आम्हाला पहिल्या मजल्यावरची संध्याकाळच्या मंद प्रकाशात उजळलेली झुंबरं दिसायची. ते स्वप्न खूप दिवस मला पडत राहिलं. एवढं लख्ख की मी माझ्या आईला फोन करून ते सांगितलं. रविवारी चर्चमधील प्रार्थनासभेला मम्मी ऑलिंडाला भेटली आणि तिला माझ्या स्वप्नाविषयी सांगितलं. ‘‘त्याला सांग, सुटीवर येशील तेव्हा मला भेटायला ये.’’
ऑलिंडा म्हणाल्या. मी तसं केलं.
१९८५ साली मी काझा डॉना मारियाचा उंबरठा ओलांडला त्या क्षणी मला वाटू लागलं, ‘हे घर माझं आहे..’ मनात आलेला तो मूर्खपणाचा विचार बाजूला सारून मी दाराबाहेरच्या पायवाटेवर उभ्या असलेल्या त्या पिकल्या केसांच्या दयाळू स्त्रीला जाऊन भेटलो.
‘ओह, तर तो तू आहेस ज्याच्या स्वप्नात माझं घर येतं..’ ऑलिंडा म्हणाल्या.
‘मग, जर तू ते एवढं स्वच्छ पाहिलंच असशील, तर तू मला का फिरून दाखवत नाहीस?’
पायवाटेच्या टोकाजवळच्या दाराने आत जाण्याऐवजी मी त्यांना म्हणालो, ‘प्रवेश उजवीकडून आहे, या पायर्यांच्या वरच्या बाजूला. तुमची खोली पायर्यांच्या वरच्या भागात आहे..’
आश्चर्यचकित होऊन त्या माझ्यामागून आल्या.
घराचा दिवाणखाना अगदी माझ्या स्वप्नातल्या सारखा होता. डावीकडून एक दार शयनगृहात जाणारं. ‘तुमचे पती या खोलीत राहायचे.’
ऑलिंडा एखाद्या भुताकडे पाहावं तसं माझ्याकडे पाहात राहिल्या.
घराची उर्वरित सफरही तशीच पार पडली. मी मोठ्या भोजनगृहाकडची वाट दाखवत पुढे निघालो. त्या माझ्यामागून शयनकक्ष, स्वैपाकघर आणि मागच्या व्हरांड्यापर्यंत फिरल्या.
ऑलिंडांनी मला चहा देऊ केला. ‘काय म्हणावं मला कळत नाहीय.. मला धक्का बसलाय.’
‘मलाही धक्काच बसलाय, मिसेस ब्रागांझा! जणू मी इथे आधी आलोय…’
ऑलिंडांनी मला त्यांच्या मॉंट्रियलमध्ये असणार्या दोन मुलांविषयी आणि लंडनमध्ये असलेल्या मुलीविषयी सांगितले. ते घर ते कसं सांभाळतात, सगळी मुलं याच घरात कशी जन्मली आहेत वगैरे वगैरे.
‘ती तिथली ‘बर्थ चेअर पाहिलीस? मुलं तिथेच जन्मली.’
१९८५ ते १९९३ या काळात ऑलिंडा आणि माझी मैत्री झाली. पहिल्यांदा त्यांना मी भेटलो तेव्हा आणि आता, मी मस्कतहून लॉस एंजिलीस, पॅरीस, मुंबई आणि इस्तंबूल अशी घरं बदलली तेव्हादेखील.
अनेकदा त्या घरावरून माझी थट्टा करायच्या. ‘मला जर कधी हे घर विकावंसं वाटलं तर मी ते तुला विकीन.’
‘ओह, वेडेपणा करू नका, ऑलिंडा.’ मी त्यांना सांगायचो. ‘तुमची मुलं आहेत आणि नातवंडंही. एवढं सुंदर घर आपल्या हातून कोण जाऊ देईल?’
… आणि आता मार्गारेट फोनवर होती.
‘ऑलिंडांची तब्येत बरी आहे ना?’ मी विचारलं.
‘ओह, नो! ती अगदी ठीक आहे. पण तिची देखभाल करणारी बाई होती तुला ठाऊक आहे ना? ती वारली. बिचारी मम्मी तिथे एकटी वावरू शकत नाही. माझे भाऊ अलॉयसिस आणि फ्रँक माझ्याशी बोलले. त्यांना ती इथे इंग्लंडमध्ये येऊन राहिलेली हवी आहे. त्यामुळे आम्ही ते घर विकायला बघतोय. मम्मीने तुला कॉल करायला सांगितलं आणि तुला घराबद्दल विचारायला…’
‘पण… मी ते विकत घ्यायच्या परिस्थितीत नाहीय. मला त्या घराची किंमत सुद्धा ठाऊक नाही. दुसर्या कोणाला तरी प्लीज ते विका.’
‘नाही, आम्हाला ते तुलाच विकायचंय. आम्हाला योग्य किंमत सांग.’
माझं मन जणू वितळून गेलं.‘मी तुला नंतर कॉल करून किंमत सांगू का?’
‘नक्कीच, वेंडेल. काही दिवसांनी मला कॉल कर. आम्ही मम्मीला २२ मे पर्यंत इथे आणू पाहतोय.’
मी फोन ठेवला आणि छताकडे बघत बसलो.
डॅडी आमचं संभाषण बघत आणि ऐकत होते. ‘ते खरंच विकू पाहतायत?’
‘हो. आणि मला ते विकत घ्यायचंय. पण माझ्याकडे बँकेत काही लाखच असतील. कदाचित जेरॉम मला काही पाठवील. आणि मी रॉबीन आणि चेस्टरकडून थोडे उधार घेऊ शकेन…’
दोन दिवसांनंतर मी मार्गारेटला कॉल केला. ‘ऐक, मार्गारेट, प्लीज दुसर्या कोणाला तरी तुमचं घर विकून टाका. मी सांगेन ती किंमत तुम्हाला अपमान वाटेल.’
‘मला सांग तू किती देऊ शकतोस.’
मी लाजत लाजत मी गोळा करू शकत असलेली रक्कम सांगितली.
‘ठीक आहे. आम्ही ती घेऊ. घासाघीस नको. आम्ही २२ मे रोजी सह्या करू.’
‘काय…?’
झालं? एका बेडरूमच्या खोलीतून मी अर्धा एकर आंबे आणि नारळाची बाग असलेल्या मॅन्शनमध्ये राहायला जाणार होतो?
ओह, परमेश्वरा! तिथे कोणालातरी मी आवडत असेन.
त्या दिवशी मी कामावर गेलो नाही. मी घरीच राहिलो. चर्चमध्ये गेलो आणि देवाचे आभार मानले. मग मी घरी आलो आणि आनंदाने रडलो.
माझ्या आयुष्यात मला हव्या असलेल्या तीन गोष्टी मला दिल्याबद्दल देवाला पुन्हा धन्यवाद दिले. माझ्या जीवनाचा भाग बनणारी व्यक्ती, माझ्या अत्यंत आवडीचे कार्यक्षेत्र आणि खेड्यातले घर!
माझ्या ३३ व्या वाढदिवशी, देवाने मला हवे ते सगळे मला दिलेले होते.
माझ्या लहरीपणाची सवय असलेले माझे आईवडील यावेळी नक्की समजत होते की मी मोठी उडी घेतोय. १९९३ सालच्या गोव्याला आजच्या एवढे ग्लॅमर नव्हते.
‘तुला इथे जे यश मिळतंय ते बघ.’ ते मला म्हणाले.
‘वेडा आहेस का, हे सगळं सोडून गोव्याला जाऊन राहणार आहेस? जरा त्याबद्दल विचार कर.’
माझे मित्र तर मला म्हणाले की मी व्यावसायिक आत्महत्या करतोय.
‘तू आणि तुझी वस्त्रप्रावरणे मीडियामध्ये कोण चर्चेत ठेवणार आहे? एकदा शहराबाहेर पडलास की ते तुला विसरून जातील.’
माझा सहायक सावियो जॉन जो स्वतः गोव्याचा होता, त्याने देखील मला वेड्यात काढले.
पण मला माझ्याविषयी खात्री होती. मी माझ्या पालकांप्रमाणे नव्हतो की निवृत्त झाल्यावर गोव्यात जायचे स्वप्न पाहावे. मला माझ्या पूर्वजांच्या भूमीमध्ये माझे आयुष्य काढायचे होते. मला कोलवाळमध्ये अभिमानी गावकार म्हणून राहायचे होते. तीच माझी नियती होती.
मी बसने गोव्याला आलो. रात्रभर मी जवळजवळ जागा होतो. मला गोवा आलेला पाहायचा होता. भल्या पहाटे सावंतवाडीत घेतलेला नाश्ता पोटात खळबळ माजवत असतानाच गोव्याची सीमा आली. डोंगरातून आलेला रस्ता संपून आता आंब्या नारळांच्या झाडांतून जाणारा सपाट रस्ता होता. काजू आणि फेणीचा वास जणू आसमंतात दरवळत होता. धारगळला मी कोलवाळची नदी चमकताना पाहिली. मला रडू कोसळले. मला इतका आनंद झाला होता की, मला वाटले की माझे ह्रदय माझ्या शरीरातून उचंबळून वेगळे होईल आणि निळ्याशार आकाशात उडून जाईल…
मार्गारेट, ऑलिंडा आणि मी म्हापशात एका वकिलाकडे गेलो. ऑलिंडाने तिची मालमत्ता जड अंतःकरणाने मला विकली.
‘घराची काळजी घे माझ्या पुता. मी तिथे सत्तर वर्षे राहिलेय. त्याची काळजी घे. ते पाडून तिथे इमारत उभारू नकोस’ ती पुन्हा पुन्हा विनवत राहिली.
‘मी या घराचा जिर्णोद्धार करीन.’ मी वचन दिलं. ‘मी आशा करतो की तुम्ही ते बघायला आणि राहायला पुन्हा याल. माझ्यासाठी ते खूप मोठं आहे. तुम्ही आणि तुमचं कुटुंब हवं तेव्हा येऊ शकता.’
मी माझा शब्द पाळला. काही वर्षांनंतर मी घराचा जिर्णोद्धार केल्यानंतर ऑलिंडांना पत्र लिहिलं आणि त्यांना गोव्यात येण्यासाठी तिकीट देऊ केलं. पण त्यांनी नकार दिला. ‘बेडरूममध्ये दोन ट्रंक आहेत. तुझ्याकडे किल्ली आहे. तुला त्यातले जे हवे ते घे. उरलेले वाटून टाक. मी घराचे फोटो पाहिले. तू ते खूप सुंदर बनवलं आहेस… पण आता माझ्यानं प्रवास झेपत नाही, वेंडेल’
काही महिन्यांतच त्यांचं निधन झालं.. त्यांची मुलं मार्गारेट, अलॉयसिस आणि फ्रँक आता कुटुंब बनली. आता जेरॉम आणि मी त्यांच्यासोबत मॉंट्रियलला राहतो किंवा ते सुटीत कोलवाळच्या घरी येतात. काझा डॉना मारिया प्रेम आणि शांतीनं भरलेलं घर बनून गेलं आहे..
मी काझा डॉना मारियात राहायला गेलो.
ऑलिंडांनी मला विचारलं, तुला तिथलं काही फर्निचर हवंय का? मी त्यांना सांगितलं, मला ते सगळंच विकत घ्यायचंय.
त्या माझ्याकडे बघत राहिल्या आणि बिचकत म्हणाल्या, ‘५०,००० रुपये फार होतील का?’
‘तुम्ही जे म्हणाल ते.’ मी उत्तरलो.
पण एक मोठी अडचण होती. मी वडिलांकडे कर्ज मागायला गेलो. ‘मी तुमच्याकडे कधीच पैसे मागितलेले नाहीत. पण मला ५०,००० रुपये मिळतील का? कधी ते ठाऊक नाही, पण घराचा जिर्णोद्धार पूर्ण होताच मी ते तुम्हाला परत करीन.
डॅडी हसले आणि त्यांनी मला नोटांचं बंडल दिलं.
आणि अशा रीतीनं, घरासोबत मला दोन फोर पोस्टर बेडस्, तीन सिंगल बेडस्, डायनिंग टेबलं, तीन लिहिण्याची टेबलं, काही बाकडी, अनेक डझन आरामखुर्च्या आणि झुलत्या खुर्च्या, ती प्रसिद्ध ‘बर्थ चेअर’ आणि अनेक खण, स्टुल्स आणि सुंदर लाकडी वस्तू मिळाल्या. मला त्या पुरातन गोअन फर्निचरचं मूल्य ठाऊक नव्हतं. अनेक वर्षांनंतर डेन्झील सिक्वेरानं मला सांगितलं की त्या एका फोर पोस्टर बेडची किंमत त्या काळी ६०,००० रुपये होती.
काझा डॉना मारिया केवळ आकारानं मोठं नव्हतं. एका छोट्या शांत गावामध्ये राहण्याचा तो अनुभवच वेगळा होता.
मी लवकर उठायचो. चहा प्यायचो. जराशी साफसफाई करून बागेत जायचो. थोडं बागकाम करून कामाला निघून जायचो. जेवणानंतर थोडी विश्रांती घेऊन तौकीर आणि मी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत काम करायचो.
रोज संध्याकाळी मी तासभर गावात फिरायला जायचो.
लवकर जेवून रात्री आठ वाजताच झोपी जायचो.
घराला मोठी परसबाग होती. आंब्याच्या झाडांवरून मी जवळजवळ चौदा हजार आंबे काढले. त्यांचं काय करायचं हे मला ठाऊक नव्हतं. मी ते शेजार्यापाजार्यांना आणि मुंबईच्या मित्रांना वाटले आणि उरलेले ढीग गावच्या गाईगुरांसाठी ठेवले.
एक दिवस माझी शेजारीण एमिलिया झुझार्ते कुंपणावरून डोकावल्या. ‘तर तू या पावसात कपडे बनवणार आहेस?’
‘हो. आणि बहुधा ते चांगले बनतील.’
ती मला बघून हसली. शहरातून हे कोण येडं गावात राहायला आलंय म्हणून असावं बहुधा.
रात्र झाली की तौकीर आणि मला घराची भीती वाटायची. त्यात भर म्हणजे मागचं विजेचं बिल चुकून भरायचं राहून गेल्यामुळे वीज तोडली होती. आम्ही तेलाचा दिवा घेऊन आणि टॉर्च घेऊन त्या क्षीण प्रकाशात घरात फिरायचो.
घराचा वरचा मजला कमकुवत होता आणि त्याला बळकटी हवी होती. आर्किटेक्ट डीन डिक्रूझनं मला सुचवलं की घराच्या पूर्वीच्या जुन्या हिंदू भागाच्या आधारासाठी दोन भिंती उभारूया. कोलवाळच्या स्थानिक गवंड्यांनी भिंतीचं प्लास्टर उखडून काढलं. उघडा पडलेला चिरा एवढा सुंदर होता की मी ती खोली तशीच सोडावी असं मला वाटून गेलं. पण ते योग्य झालं नसतं.
चिर्यात पावसात ओल होते आणि त्याचा परिणाम भिंतींवर झाला असता. आधारासाठी भिंती उभारल्या गेल्या आणि खोलीला नवा मजला दिला गेला. तौकीरनं त्याचं शिलाई यंत्र वरच्या मजल्यावर हलवलं आणि शिवा/विष्णू टेम्पल कलेक्शनचे पोशाख शिवले.
डॅडी आणि मम्मींनी रोज पंचायत कचेरीत हेलपाटे घालून घराची वीज परत आणली. ते रोज घराच्या जिर्णोद्धाराच्या कामावर देखरेख करायचे. सेंट रॉक वाड्यावरील त्यांचं घर सोडून या घराच्या जिर्णोद्धारावर लक्ष ठेवण्यासाठी ते इथे काही दिवस राहायला आले.
पावसाळ्यात मी इस्तंबूलला गेलो आणि परत आलो तेव्हा घराचे बरेचसे काम झाले होते, पण अजूनही ते राहण्यालायक झाले नव्हते. मी माझ्या सामानासह एका खोलीत राहायचो, तर तौकीरने वरच्या मजल्यावरची बेडरूम व्यापली होती.
स्वैपाकघराच्या भिंती अनेक दशकांच्या काजळीनं काळ्या पडल्या होत्या. आम्ही टेबलावर स्वैपाक करायचो. काही भाज्या, मोड आलेल्या शेंगा आणि भात.
स्वैपाकघराच्या भिंती रंगवल्या तेव्हा ती जागा मोठी भासू लागली. घरातल्या रीवायरिंगला तीन आठवडे पुरतील असं वाटलं होतं, त्याला नऊ महिने लागले.
बागेतही साफसफाई गरजेची होती. तौकीर आणि मी तिथे साफसफाई केली. आमचे हात देखील दगडाच्या खाणीतील मजुरांसारखे दिसू लागले.
बागेच्या मातीतून ऑलिंडांच्या वर्षानुवर्षांच्या औषधांच्या बाटल्या, चपला, फुटके चिनीमातीचे सामानसुमान वर आले. हा सगळा ढिगारा काढल्यानंतर माझ्या व्यंगचित्रकार मित्राकडे, ऍलेक्सीज् कडे मी ते सोपवले. आलेक्स शिवोलीहून आला आणि बागेची फेररचना केली. वाळूचे दोन पट्टे आखून स्थानिक झाडं लावली. एक बदामाचं आणि नारळाचं झाड लावलं. मी पुढे त्यात आणखी भर घातली. आधीचे बारा माड, डझनभर आंब्याची झाडं, पाच पेरूची झाडं, कडिपत्ता, हळद, मिरच्या वगैरेंच्या जोडीनं लिंबू लावले, केळी, पपई, मलबेरी वगैरेंची झाडं लावली. पावसाळ्यात भाज्या रोवायचो. तांबडी भाजी, भेंडी, काकडी, पांढरा आणि लाल भोपळा. गोव्याची माती सुपीक आहे. अननस, चिकू, सुगंधी मोगरा लावला. मुळं धरली, बहरली. आंब्याच्या झाडावर मिरवेली आहेत.
घराचं आणि बागेचं काम संथगतीनं सुरू असतानाच या निसर्गसान्निध्यात माझा गोव्यातील पहिलावहिला वस्त्रप्रावरणांचा संच तयार झाला. अननसाची पानं आणि केळीचे गबे उकळून त्यातून फायबर काढला. जंगली कापूस आणि रेशीम याच्यासोबत विणला. एक नवा नैसर्गिक धागा तयार झाला. गहू आणि कापूस यांचाही प्रयोग आम्ही केला. सिल्क ऑर्गान्झा आणि कापूस यातून स्टोल बनवले. गोव्याच्या चुडतांपासून प्रेरणा घेऊन सुंदर सिल्क ऑर्गान्झा चोळी ब्लाऊज तयार झाला. वरच्या मजल्यावरच्या दोन शिवणयंत्रांत आमचा ‘स्टुडिओ’ बनला. तौकीरनं ज्योती नावाच्या स्थानिक मुलीला मदतीला घेतलं. नंतर रेवोड्याची मार्था आली. दोन्ही मुलींना माझी कीर्ती आणि मुंबई, दिल्ली, आणि बंगलुरूच्या माझ्या दुकानांतील श्रीमंती थाट ठाऊक नव्हता. आमचा उत्तमाचा ध्यास बघून त्या थक्क व्हायच्या. त्यांनी शिवलेले कपडे आमच्या मनासारखे झाले नाही तर आम्ही फाडून टाकायचो किंवा टाकून द्यायचो. या गावच्या साध्या मुलींचे रूपांतर समर्थ, व्यावसायिक कलाकारांत होताना बघणं आनंददायक होतं. आलेक्सीनं मला माझ्या आजोळच्या गावच्या कामुर्लीच्या एका मुलाची गाठ घालून दिली. फ्रँकोचं घर नारळांच्या बागेतल्या एका टेकडीवर होतं. मागं नदी वहायची. नारळाच्या करवंटीपासून तो थक्क करणार्या कलाकृती बनवायचा. काही आठवड्यांतच त्यानं नारळाच्या करवंटीपासून पानांच्या आकाराची बटणं, बांगड्या, बाजूबंद आणि कानातली बनवली. स्टुडिओंत लटकणार्या कपड्यांना ती शोभून दिसली.
मी ती सगळी सामुग्री काळजीपूर्वक बांधून बसवरून मुंबईला पाठवली.
अल्टामाऊंट रस्त्यावरच्या सय्यदच्या स्टुडिओत रफीकनं असं काही तंत्र वापरलं की आम्ही पाठवलेले ते कपडे असे काही झळाळून उठले! कृष्णधवल रंगात त्यांची छायाचित्रे घेतली. काही प्रिंटस्वर जलरंगात रंग भरले. ते फोटो इतके छान आले की सत्य सरनने ते कलेक्शन फेमिनाच्या कव्हरवर आणि आठ पानांत सलग छापलं!
ती आमचा स्टुडिओ बघायला कोलवाळला आली. घरापलीकडच्या लॅटीन चॅपेलमध्ये रोझरी गायली जात असताना सांजवेळी ती घरी आली. मी संध्याकाळच्या धूसर प्रकाशात बसलो होतो. दिवसभर अननसाच्या पानांतून धागा काढून थकलो होतो. सत्याला ते दृश्य भावलं. ज्या वातावरणात हे कपडे बनत आहेत ते तिनं प्रत्यक्ष पाहिलं आणि त्याविषयी लिहिलं. गोव्यात राहूनही माझ्यावर प्रसिद्धीमाध्यमांचा झोत पडला! मी त्या कलेक्शनला नाव दिलं, ‘प्रॉडिगेल.’ घरी परत आलेला मी तो पश्चात्तापदग्ध मुलगा होतो!