काजू, नारळाच्या आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

0
166

>> उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांची माहिती

राज्य सरकारने काजू, नारळ आणि हळसांदे यांच्या आधारभूत किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी आधारभूत किंमतीच्या विषयावर चर्चा केली असून त्यांनी आधारभूत किंमत वाढविण्यास सहमती दर्शविली आहे. आता, आधारभूत किंमत वाढीसंबंधीची प्रस्ताव वित्त खात्याकडे पाठविला जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

राज्यात काजूचा दर कमी असल्याची तक्रार केली जात आहे. राज्यातील काही काजू बागायतदारांशी बैठक घेऊन काजूदराच्या प्रश्‍नावर चर्चा केली. गोवा बागायतदार संस्थेकडून १०५ रुपये प्रति किलो दराने काजूची खरेदी केली जात आहे. राज्यातील काजू बागायतदार शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी कृषी खात्याने काजूच्या आधारभूत किंमतीमध्ये १०० रुपयांवरून १२५ रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. काजूच्या आधारभूत किंमतीमध्ये २५ टक्के वाढ केली जाणार आहे. नारळाच्या आधारभूत किंमतीमध्ये २० टक्के वाढ करून १० रुपयांवरून १२ रुपये, तसेच, हळसांदेच्या आधारभूत दरात ३० टक्के वाढ करून तो दर ७० रुपयांवरून १०० रुपये प्रति किलो असा केला जाणार आहे. काजूच्या आधारभूत दरात मागील चार वर्षांत वाढ करण्यात आलेली नाही, असेही उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी सांगितले.

लॉकडाऊनच्या पूर्वी बाजारपेठेत काजूला १३५-१४० असा दर दिला जात होता. लॉकडाऊनमुळे काजूच्या दरात घसरण झाली. काजूची खरेदी थांबविली होती. तर, काही जणांनी ६०-६५ रुपये प्रति किलो दराने काजूची खरेदी करण्यास प्रारंभ केला होता. शेतकरी अडचणीत येणार असल्याने गोवा बागायतदार संस्थेला काजू विकत घेण्याची सूचना करण्यात आली होती, असेही उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याशी गोमंतकीय खलाशांना परत आणण्याच्या विषयावर चर्चा केली. खलाशांना क्वारंटाईन करून ठेवण्यासाठी  पंचतारांकित हॉटेलसुद्धा ताब्यात घेतली जाणार आहे, असेही उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी सांगितले.