>> विजय सरदेसाई यांचे मुख्य सचिवांना पत्र
परराज्यातून आणल्या जाणाऱ्या हलक्या दर्जाच्या काजू गरामुळे गोव्यातील उत्पादक अडचणीत आले असून त्यांना संरक्षण देण्यासाठी गोव्याच्या काजुगरांना जी आय टॅग घोषित करा, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली आहे.
स्थानिक उद्योगांचे रक्षण करण्यासाठी सरदेसाई यांनी मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल यांना पत्र लिहिले असून या पत्रात त्यांनी, गोवा काजूगरासाठी जीआय टॅग मिळविण्याची प्रक्रिया वेगवान करावी. हा टॅग हे गोव्याच्या काजू उद्योगाला प्रोत्साहन देण्यास आणि संरक्षित करण्यास मदत करेल त्यामुळे बाहेरील लोकांकडून होणारे शोषण रोखण्यास मदत होईल असे म्हटले आहे.
गोव्यात उपलब्ध असलेल्या काजूचे ग्रेड दाखवणे अनिवार्य करा तसेच डब्ल्यू320 पेक्षा जास्त ग्रेड असलेल्या इतर राज्यांमधील काजूच्या आयातीवर आणि विक्रीवर गोव्यात बंदी घाला, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, बदलते हवामान, पीक संरक्षणाचे उपाय न करणे, वन्य प्राण्यांचे आक्रमण, पिकाला पोषक वातावरण नसणे, अवेळी पडणारा पाऊस त्यामुळे काजूचे उत्पन्न झटल्याचे त्यांनी म्हटले आहे.