काऊंटीत खेळणार सात भारतीय खेळाडू

0
92

टीम इंडियाचे सात खेळाडू काऊंटी क्रिकेट खेळण्यास सज्ज झाले आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धे अंतर्गत जुलै-ऑगस्टमध्ये वेस्ट इंडीजशी दोन हात करण्यापूर्वी ‘ड्यूक्स’ चेंडूचा सराव करण्यासाठी कसोटी स्पेशलिस्ट खेळाडूंना काऊंटीत खेळण्याची परवानगी ‘बीसीसीआय’कडून देण्यात आली आहे. काऊंटीसाठी परवानगी देण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, हनुमा विहारी, मयंक अगरवाल, रविचंद्रन अश्‍विन व इशांत शर्मा यांचा समावेश आहे. पुजाराचा यॉर्कशायरशी तीन वर्षांचा करार असून पुन्हा या काऊंटी संघाकडून खेळण्याची तयारी त्याने केली आहे. रहाणे हॅम्पशायरकडून खेळू शकतो.

बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी यासाठी परवानगी दिली असून डायना एडुलजी व रवी थोडगे यांची अजून संमती मिळणे बाकी आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने लेस्टरशायर, इसेक्स व नॉटिंघमशायर या काऊंटी संघांशी संपर्क साधला असून त्यांच्याशी बोलणी सुरू आहे. विंडीजविरुद्धच्या मालिकेपूर्वी या खेळाडूंनी किमान तीन-चार प्रथमश्रेणी सामने खेळावे, अशी मंडळाची अपेक्षा आहे. इंग्लंड व विंडीजमधील परिस्थिती भिन्न असली तरी दोन्ही देशांत ‘ड्यूक्स’ चेंडूचा वापर केला जातो. त्यामुळे सातही भारतीय खेळाडूंना काऊंटीतील प्रथम किंवा द्वितीय विभागात खेळविण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे.