कामूतीवाडो-कांदोळी येथील सेबेस्तियन डिसोझा यांच्या समुद्रकिनारी असलेल्या झोपडीला मंगळवारी रात्री आग लागल्याने त्यात एक होडी व इतर सामान जळून खाक झाले. यात त्यांना ८ लाख रुपयांचे नुकसान झाले.
या आगीत २ कुलर, ५० सनबेड, ५० गाद्या, ५ रॅक, ५ स्टॅन्ड, प्लास्टिक खुर्च्या, टेबल, २ लाकडी काऊंटर, बांबू, लाकडी सामान, दारुच्या बाटल्या व इतर सामान जळून खाक झाले. या आगीची माहिती पणजी अग्निशामक दलाला देताच त्यांनी पिळर्ण दलाला यांची माहिती दिली आणि पिळर्ण व पणजी दलाचे अधिकारी व जवान सर्वश्री बॉस्को फेर्रांव भरत गोवेकर, शामसुंदर पाटील, प्रशांत सावंत, गौरेश नाईक, केतन कामूलकर व राजेश पिरणकर यांनी घटनास्थळी पाण्याचे बंब घेऊन गेले व आग विझविली.
आगीत झोपडीसहीत सर्व माल व एक होडी जळून खाक झाल्याने सेबेस्तियन डिसोझा यांना ८ लाख रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान, डिसोझा यांनी आज पहाटे कळंगुट पोलीस स्थानकात ही आग आग्नेल फर्नांडिस यांनी लावल्याची तक्रार दिली. कळंगुट पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन हळर्णकर पुढील तपास करीत आहेत.