कांदोळीत हॉटेल व्यावसायिकाची निर्घृण हत्या

0
94

>> दोन्ही संशयितांना १२ तासांच्या आत गदग, कर्नाटक येथे अटक

कांदोळी येेथील सन अँड सँड अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या दिल्लीस्थित विश्‍वजित सिंग या हॉटेल व्यावसायिकाचा मंगळवारी मध्यरात्री दीड ते दोनच्या दरम्यान घरात घुसून तलवारीने सपासप वार करून निर्घृण खून करण्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेनंतर पळून गेलेल्या उमेश टुकाप्पा राठोड, नेरुल (मूळ कर्नाटक) व त्याचा मित्र दयाशंकर (सध्या राहणारा कळंगुट) या दोन्ही संशयित खुन्यांना बारा तासांच्या आत गदग, कर्नाटक येथून जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

कळंगुट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदोळीतील बामणवाडा येथील सन अँड सँड अपार्टमेंटमध्ये विश्वजित राहत होते. सोमवारी मध्यरात्री संशयित उमेश टुकाप्पा राठोड आणि त्याचा मित्र दयाशंकर या दोघांनी विश्वजित सिंग यांच्या कांदोळीतील अपार्टमेंटमध्ये बेकायदा प्रवेश करून तलवारीचे वार करून त्यांची हत्या केली व पसार झाले. संशयित खुनी उमेश राठोड हा गेल्या तीन वर्षांपासून विश्वजितकडे कामगार म्हणून कामाला होता अशी माहिती मयत विश्‍वजीतच्या शेजार्‍यांनी पोलिसांना दिली आहे.

काल सकाळी खुनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कळंगुट पोलीस स्थानकात रीतसर तक्रार नोंदविण्यात आली. अधीक्षक चंदन चौधरी तसेच उपअधीक्षक सेराफिन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली हणजुणचे निरीक्षक सी. एल. पाटील, म्हापशाचे तुषार लोटलीकर तसेच कळंगुटचे निरीक्षक जीवबा दळवी यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. अपार्टमेंटमधील रहिवासी तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधाराने तपासाची चक्रे गतिमान केली. शवविच्छेदन तज्ञ, ठसेतज्ञ यांचीही मदत घेण्यात आली.

विश्वजीतचे शेजारी, तसेच सिसीटीव्ही फुटेज आणी उपलब्ध साक्षीदारांच्या मदतीने पोलिसांनी संशयित उमेश राहत असलेले नेरुल येथील घर गाठले. त्यानंतर उमेश राठोड गदग येथे असल्याचा सुगावा लागताच क्षणाचाही विलंब न करता गदग पोलिसांशी संपर्क साधून संशयिताची माहिती दिली. कळंगुट पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गदग पोलिसांनी काल दुपारपर्यंत संशयित उमेशला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर दुसरा संशयित दयाशंकर यालाही ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, कळंगुट पोलीस पथक दोघाही संशयित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गदग-कर्नाटकला रवाना झाल्याची माहिती कळंगुट निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिली.