शारजा, दुबई येथे आयपीएलचे सामने सुरू झाल्यानंतर राज्यात बेटिंगचा जोर चढला असून गोवा पोलिसांनी चार-पाच दिवसांच्या काळात आयपीएल सामन्यांच्या वेळी बेटिंग घेणार्या तीन टोळ्यांचा पर्दाफाश केला आहे. कळंगुट पोलिसांनी आयपीएल बेटिंगप्रकरणी काल कांदोळीत आणखी तिघांना अटक केली आहे. परराज्यातील टोळके हॉटेलमध्ये राहून आयपीएल बेटिंग घेत आहेत.
कळंगुट पोलिसांनी कांदोळी येथे एका रिसॉर्टवर छापा घालून आयपीएल बेटिंग घेणारी आणखी एक टोळी शनिवारी मध्यरात्री पकडली. राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील सामन्याची वेळी बेटिंग घेणार्या तीन जणांना अटक केली आहे. त्यांनी रिसॉर्टच्या रूममध्ये अड्डा सुरू केला होता. या प्रकरणी हैदराबाद येथील राजू राव, भानू पी. आणि शशी किरण या तिघांना अटक केली आहे. त्याच्याकडून तीन मोबाईल फोन, एक लॅपटॉप आणि रोख ८४०० रुपये जप्त करण्यात आले आहेत. कळंगुट पोलिसांनी यापूर्वी कांदोळी येथे छापा घालून राजस्थानमधील ४ आणि नेपाळमधील १ युवकाला अटक केली. त्यानंतर गुन्हा अन्वेषण विभागाने मोरजी येथे छापा घालून हैदराबाद येथील तीन जणांना अटक केलेली आहे.