कांदोळीच्या संगीत महोत्सवात तरूणीचा गूढ मृत्यू

0
96

अमली पदार्थाच्या अतिसेवनाचा संशय * कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकारवर टीकास्त्र
कांदोळी येथे सध्या सुरू असलेल्या सुपरसॉनिक इलेक्ट्रॉनिक डान्स अँड म्युझिक फेस्टिव्हल (ईडीएम) या संगीत महोत्सवात हजेरी लावण्यासाठी आलेल्या ईशा मंत्री या बॉलिवूडमधील कॉस्च्युम डिझायनर तरूणीचा सोमवारी रात्री संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. अमली पदार्थाच्या अतिसेवनातूनच ईशाचा मृत्यू झाल्याचा आरोप कॉंग्रेसने केला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे. ईशा मंत्री हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात पाठवण्यात आला असून वैद्यकीय अहवालानंतरच तिच्या मृत्यूचे कारण कळू शकेल.एका ज्येष्ठ पोलीस अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, मृत ईशा ही मूळ ओरिसाची असून तिचे मुंबईत वास्तव्य होते. मुंबईहून तेराजणांचा एक गट गोव्यात या संगीत महोत्सवाच्या निमित्ताने आला होता.
सोमवारी रात्री १०.३० च्या सुमारास सुपरसॉनिक संगीत महोत्सवाच्या स्थळाबाहेर तिला एकाएकी उलट्या सुरू झाल्या. तिची प्रकृती गंभीर बनल्याने तिला स्थानिक इस्पितळात नेण्याचा प्रयत्न झाला. मात्र वाटेतच तिचे तडकाफडकी निधन झाल्याचे या पोलीस अधिकार्‍याने सांगितले. ईशाला मृतावस्थेतच इस्पितळात आणले गेले होते असे वैद्यकीय अधिकार्‍यांनीही पोलिसांना सांगितले आहे.
अमली पदार्थ सेवनाचा संशय
ईशासोबत आलेल्या तिच्या मित्रमैत्रिणींनी तिने अँटिबायोटिक औषध घेतल्याचा दावा केला असला, तरी अमली पदार्थ सेवनातूनच तिचा मृत्यू ओढवल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, यासंदर्भात पोलीस अधिकारी अधिकृतपणे बोलायला तयार नाहीत. कळंगूट पोलीस तसेच पोलीस मुख्यालयातील अधिकार्‍यांनीही याबाबत मौन बाळगले आहे. या मृत्यूप्रकरणामागील कारणाचा गवगवा होऊ नये यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा आहे.
संगीत महोत्सवांतून अमली पदार्थांचा वापर होत नसल्याचा दावा पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांनी केला होता. मात्र, या मृत्यू प्रकरणामुळे त्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कॉंग्रेसचा सरकारवर आरोप
दरम्यान, कॉंग्रेस प्रवक्ते सुनील कवठणकर यांनी ईशा मंत्री मृत्यू प्रकरणी सरकारला जबाबदार धरले असून संगीत महोत्सवांच्या आडून अमली पदार्थांचा व्यवहार होत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. पोलिसांना गुन्हे न नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचा आरोपही कवठणकर यांनी काल केला. हे महोत्सव त्वरित बंद केले जावेत अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली. महोत्सवास आलेल्या अनेक युवतींना बेशुद्धावस्थेत खासगी इस्पितळांमध्ये दाखल केले जात आहे अशी माहिती मिळाल्याचे कवठणकर यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचेही टीकास्त्र
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो यांनीही ईशा मंत्री मृत्यूप्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली आहे. यापूर्वी मेहा बहुगुणा हिचा अशाच महोत्सवाच मृत्यू झाला होता व तिच्या पालकांवर तत्कालीन सरकारने दडपण आणले होते आणि आताही हाच प्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
ईडीएम प्रकरणी उच्च न्यायालयात आपला अर्ज पडून आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व उत्तर गोवा पोलिसांनी अशा महोत्सवांमुळे कोणता धोका संभवतो त्याविषयी यापूर्वीच अहवाल दिलेला आहे. ती कागदपत्रे आपण त्या अर्जाला जोडलेली आहेत. त्यावर १२ जानेवारीस सुनावणी ठेवण्यात आली आहे. सरकारने महोत्सवाला परवानगी नाकारली असती तर ईशाचा मृत्यू ओढवला नसता, असे डिमेलो म्हणाले. विरोधात असताना भाजप अशा महोत्सवांविरुद्ध आवाज उठवीत असे. मात्र, आता सत्तेवर येताच सरकार पाठराखण करीत आहे अशी टीका त्यांनी केली. गोव्यातील युवक अमली पदार्थांच्या आहारी जात असून पालकांना त्याची चिंता आहे, असे डिमेलो म्हणाले.
कांदोळीत मृत्यू पावलेली ईशा मंत्री ‘मेरी कोम’ ची कॉस्च्युम डिझायनर
कांदोळीच्या सुपरसॉनिक संगीत महोत्सवाच्या ठिकाणी गूढरीत्या मृत्यू पावलेली ईशा मंत्री ही बॉलिवूडमधील यशस्वी कॉस्च्युम डिझायनर असून अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘मेरी कोम’ चित्रपटातील कलाकारांचे पेहराव तिनेच डिझाईन केले होते. गेली चार वर्षे ती बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांसाठी कॉस्च्युम डिझायनर म्हणून काम करीत आली असून अलीकडेच ‘व्हिमविट डिझाइन’ नामक स्वतःचा डिझाईन स्टुडिओ तिने भागिदारीत सुरू केला होता.
मुंबईच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी) ची पदवीधर असलेल्या ईशाने २०१० साली रेडिओ मिर्चीसाठी मर्कंडाईझ डिझायनिंग करून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली. २०११ साली तिला एका अमेरिकी नियतकालिकासाठी फॅशन फोटो स्प्रेड करण्याची संधी चालून आली. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये सहायक कॉस्च्युम डिझायनर म्हणून पदार्पण केले. २०१२ साली ‘डेंजरस इश्क’, ‘जिला गाझियाबाद’, अशा छोट्या मोठ्या चित्रपटांतून कॉस्च्युम डिझायनिंग करता करता तिला जाहिरातपटांचे दिग्दर्शक एहसान हैदर यांच्या ‘वो आदमी बहुत कुछ जानता था’ या राजीव खंडेलवाल अभिनीत चित्रपटासाठी, विक्रम भट निर्मित व टिनू देसाई दिग्दर्शित ‘१९२० लंडन’, ‘राझ -३’, आदी चित्रपटांतील कलाकारांचे पेहराव डिझाईन करण्याची संधी मिळाली. आयडियाच्या दिवाळीसाठीच्या खास जाहिरातपटातील, तसेच ‘रेनॉल्ट’च्या जाहिरातीतील कलाकारांच्या कपड्यांचे डिझायनिंगही ईशाने केले होते. गेल्या वर्षी तिला ‘हेट स्टोरी – २’, ‘क्रिचर्स थ्रीडी’ तसेच ‘मेरी कोम’ या चित्रपटांसाठी कॉस्च्युम डिझायनिंग करण्याची संधी लाभली होती. ‘मेरी कोम’ मध्ये प्रियंका चोप्रासाठी तिने डिझाईन केलेल्या कपड्यांमुळे तिला नव्या व्यावसायिक संधी खुणावू लागल्या होत्या. मात्र, कांदोळीच्या संगीत महोत्सवाच्या निमित्ताने गोव्यात आली असताना तिच्या झालेल्या गूढ मृत्यूने एक कळी अकालीच खुडली गेली आहे. तिच्या ‘फेसबुक’ पेजवर तिच्या मित्रमैत्रिणींचे शोकसंदेश काल दिवसभर पाहायला मिळत होते.