कांदा ७० रु., कोथंबीर ५० रु.

0
145

>> पणजी मार्केटमध्ये दर भडकले

राजधानी पणजीतील मार्केटमध्ये कांद्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. रविवारी पणजी मार्केटमध्ये कांद्याची ७० रुपये प्रति किलो आणि सहकार भांडाराच्या भाजी विभागात ६० रुपये प्रति किलो दराने विक्री केली जात होती. ओल्या कोथंबिरच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

कर्नाटक, महाराष्ट्र राज्यात आलेल्या पुरानंतर गोव्यातील कांद्यांच्या दरात वाढ झाली होती. कांद्याचा दर ६० रुपये प्रति किलोवर पोहोचला होता. काही दिवसानंतर कांद्याच्या दरात घट होऊन ४० ते ४२ रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला होता. आता पुन्हा एकदा दर्जेदार कांद्यांचा दर ७० रुपये प्रति किलो एवढा झाला आहे. मार्केटमध्ये कमी प्रतीचा कांदा ५० ते ६० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. कोल्हापूर आणि परिसरात परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. कांदा आणि इतर भाज्यांची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाल्याची माहिती भाजी विक्रेत्यांकडून दिली जात आहे. गोवा मार्केटिंग फेडरेशनच्या भाजी विभागात कांद्याची विक्री ६० रुपये प्रति किलो दराने रविवारी केली जात होती. मार्केटमध्ये ओल्या कोथंबिरची एक जुडी ५० रुपये दराने विकली जात आहे. लाल भाजी, मेथीचा तुटवडा जाणवत आहे.