साडेपाच कोटी रुपयांच्या कांदा घोटाळा प्रकरणी गोवा राज्य मार्केटिंग अँड सप्लाय फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक काशिनाथ नाईक यांना निलंबित करण्यात आले. नाफेड (नॅशनल ॲग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया), तसेच नाशिकमधील इतर फेडरेशनची मिळून 5.5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली नाशिकच्या मुंबई नाका पोलीस स्थानकात नाईक यांच्याविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत गोव्यात फेडरेशनच्या दालनांमधून सवलतीच्या दरात विक्री करण्यासाठी नाफेडकडून 1 हजार 589 मेट्रिक टन एवढा कांदा 35 रुपये प्रती किलो या दराने खरेदी करण्यात आला होता. नाफेडच्या अधिकाऱ्यानी यासंबंधी दाखल केलेल्या तक्रारीनुसार गोवा मार्केटिंग फेडरेशनने वैयक्तिक फायद्यासाठी तो जास्त बाजारभावाने विकला व ग्राहकांची फसवणूक केली. नाशिक येथील आर्थिक गुन्हे पोलीस विभाग चौकशी करीत आहेत.