इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यातील दिवस-रात्र कसोटी सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या ३५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने चौथ्या दिवशी ४ बाद १७६ धावांपर्यंत मजल मारली आहे. त्यांना शेवटच्या दिवशी १७८ धावांची आवश्यकता असून त्यांचे ६ गडी शिल्लक आहेत. इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट (नाबाद ६७) हा कांगारूंच्या विजयातील प्रमुख अडथळा असून इंग्लंडला मालिकेत बरोबरी साधून देण्याच्या इराद्याने त्याने टिच्चून फलंदाजी केली आहे.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने तिसर्या दिवसाच्या ४ बाद ५३ धावांवरून पुढे खेळताना दुसर्या डावात १३८ धावांपर्यंत मजल मारली. जेम्स अँडरसन व ख्रिस वोक्स ही इंग्लंडची वेगवान दुकली कांगारूंसाठी कर्दनकाळ ठरली. अँडरसनने ४३ धावांत ५ तर वोक्सने ३६ धावांत ४ गडी बाद केले. ओव्हर्टनने १ बळी प्राप्त केला.
आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना कूक व स्टोनमन यांनी इंग्लंडला दुसर्या डावात अर्धशतकी सलामी दिली. परंतु, बिनबाद ५३ वरून त्यांची सर्वप्रथम २ बाद ५४ अशी व यानंतर ३ बाद ९१ अशी घसरगुंडी उडाली. कर्णधार रुट याने यानंतर डेव्हिड मलान (२९) याच्यासह चौथ्या गड्यासाठी ७८ धावांची भागीदारी केली. कमिन्सने दिवसातील अंतिम क्षणांत मलानचा त्रिफळा उडवून सामना काहीअंशी कांगारूंच्या बाजूने झुकवला आहे. ऑस्ट्रेलियाकडून दुसर्या डावात स्टार्कने २ तर कमिन्स व लायनने प्रत्येकी १ गडी बाद केला आहे.