>> ऑफस्पिनर नॅथन लायनचे दुसर्या डावात ६ बळी
पहिल्या ऍशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाने यजमान इंग्लंडचा २५१ धावांनी दारूण पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. तसेच आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील पहिला विजय आपल्या नावे करण्याचा मान मिळविला. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३९८ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. ऑस्ट्रेलियाचे हे आव्हान इंग्लंडला पेलवले नाही आणि त्यांचा डाव ५२.३ षटकात १४६ धावांमध्ये संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून ऑफब्रेक गोलंदाज नॅथन लायनने बळींचा षटकार लगावला, तर कमिन्सने बळींचा चौकार ठोकत त्याला उत्तम साथ दिली.
चौथ्या दिवशीच्या बिनबाद १३ धावांवरून काल पाचव्या दिवशी इंग्लंडने आपला डाव पुढे सुरू केला. पहिल्या डावातील शतकवीर रॉरी बर्न्स याच्याकडून संघाला खूप अपेक्षा होत्या. परंतु, केवळ ११ धावांवर त्याने तंबूची वाट धरली. यानंतर जेसन रॉय व कर्णधार ज्यो रुट यांच्यात छोटेखानी भागीदारी झाली. परंतु, ही भागीदारी फुटल्यानंतर इंग्लंडची १ बाद ६० वरून ७ बाद ९७ अशी दाणादाण उडाली. त्यांच्या मधल्या फळीने खेळपटट्टीवर राहण्याची तसदीच घेतली नाही. तळाला वोक्सने ३७ धावा करत पराभवाचे अंतर कमी केले. त्यांचा डाव १४६ धावांमध्ये गारद झाला. इंग्लंडला या सामन्यात अँडरसनची कमतरता जाणवली. पहिल्या डावात केवळ चार षटके टाकून मैदान सोडावे लागल्यानंतर अँडरसनने दुसर्या डावात गोलंदाजी केली नाही. त्यामुळे इंग्लंडची गोलंदाजी बोथट झाली. याचाच फायदा स्टीव स्मिथ व सहकार्यांनी उचलत यजमानांवर पराभव लादला. बर्मिघमच्या या मैदानावर ऑस्ट्रेलियाने २००१ साली शेवटच्या वेळी विजयाची चव चाखली होती. यानंतर सातत्याने त्यांचा पराभव झाला होता. परंतु,या पराभवाच्या मालिकेला ब्रेक लावण्याचे काम त्यांनी काल केले. मालिकेतील दुसरा कसोटी सामना १४ ऑगस्टपासून लॉडर्सवर खेळविण्यात येणार आहे.
धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव ः सर्वबाद २८४
इंग्लंड पहिला डाव ः सर्वबाद ३७४
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव ः ७ बाद ४८७ घोषित
इंग्लंड दुसरा डाव ः रॉरी बर्न्स झे. लायन गो. कमिन्स ११, जेसन रॉय त्रि. गो. लायन २८, ज्यो रुट झे. बॅन्क्रॉफ्ट गो. लायन २८, ज्यो डेन्ली झे. बॅन्क्रॉफ्ट गो. लायन ११, जोस बटलर त्रि. गो. कमिन्स १, बेन स्टोक्स झे. पेन गो. लायन ६, मोईन अली झे. वॉर्नर गो. लायन ४, ख्रिस वोक्स झे. स्मिथ गो. कमिन्स ३७, स्टुअर्ट ब्रॉड झे. स्मिथ गो. लायन ०, जेम्स अँडरसन नाबाद ४, अवांतर १०, एकूण ५२.३ षटकांत सर्वबाद १४६
गोलंदाजी ः पीटर सिडल १२-२-२८-०, नॅथन लायन २०-५-४९-६, जेम्स पॅटिन्सन ८-१-२९-०, पॅट कमिन्स ११.३-३-३२-४, स्टीव स्मिथ १-१-०-०