महिला काँग्रेसच्या नवनिर्वाचित अध्यक्षा प्रतीक्षा खलप यांचा शपथग्रहण सोहळा संपन्न
गोव्यात काँग्रेस पक्षातील काही नेते बेशिस्त वर्तन करीत आहेत. यापुढे बेशिस्तपणे वागणाऱ्या नेत्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे, असा इशारा गोवा काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी काल येथे दिला. तसेच कुठल्याही नेत्याला पक्ष सोडायचा असल्यास त्यांनी अवश्य पक्षातून बाहेर जावे. पक्ष कुणा एका व्यक्तीवर चालत नाही, असेही त्यांनी सांगितले.
गोवा प्रदेश महिला काँग्रेसच्या नवनिर्वाचित अध्यक्षा प्रतीक्षा खलप यांच्या शपथग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा, गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, प्रभारी सचिव डॉ. अंजली निंबाळकर, माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आदींची उपस्थिती होती.
गोव्यातील काँग्रेस पक्षातील काही नेत्यांकडून शिस्तीचे पालन केले जात नाही. मात्र पक्षातील बेशिस्त नेते माध्यमांतून चुकीची माहिती देत आहेत. काँग्रेसमध्ये असा बेशिस्त कारभार खपवून घेतला जाणार नाही, असे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.
आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस हे गोव्यातील काँग्रेस पक्षाची मते फोडण्याचे काम करत आहे. मागील विधानसभा निवडणूक या पक्षांनी काँग्रेसची मते फोडण्याचे काम केले. त्यामुळे आगामी 2027 च्या निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष आणि तृणमूल कॉँग्रेस यांनी उतरू नये. गोव्यातील जनता काँग्रेसला साथ देणार आहे, असे काँग्रेसच्या प्रभारी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी सांगितले.
महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतीक्षा खलप यांना गोवा प्रदेश काँग्रेस समितीचा पूर्ण पाठिंबा आहे, असे अमित पाटकर यांनी सांगितले. प्रतीक्षा खलप यांच्याबाबत काही अफवा पसरविण्यात येत आहेत. काँग्रेसला मागे खेचण्यात काही स्वकीय गुंतले आहेत. अशा लोकांना शोधून काढणे आवश्यक आहे, असेही पाटकर यांनी सांगितले.
महिलांनी पुढे येऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. काँग्रेस पक्ष महिलांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे, असे अध्यक्षा अलका लांबा यांनी सांगितले.
गोव्यातील महिलांना रोजगार उद्योगात समान संधी देण्यासाठी, तसेच महिलांच्या प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे प्रतीक्षा खलप यांनी यावेळी सांगितले.