काँग्रेसने दोन्ही जागांवर तरुण, नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी : आप

0
12

काँग्रेस पक्षाने उत्तर व दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीसाठीचे उमेदवार निवडताना तरुण व नव्या चेहऱ्यांचा विचार करावा, अशी सूचना त्यांना इंडिया आघाडीचा घटक पक्ष ह्या नात्याने आम आदमी पक्षाने केली आहे, असे काल ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी स्पष्ट केले.

आम्ही कुणाचेही नाव घेतलेले नाही किंवा अमूकच व्यक्तीला उमेदवारी द्या, अशी मागणी काँग्रेस पक्षाकडे केलेली नाही. इंडिया आघाडीच्या गोव्यातील दोन्ही जागा ह्या काँग्रेस पक्षाला मिळाल्या आहेत. त्यामुळे उमेदवारी कुणाला द्यायची याचा निर्णय काँग्रेस पक्षच घेणार आहे; मात्र आम्ही त्यांना यंदा दोन्ही मतदारसंघात शक्यतो तरुण नेत्यांना उमेदवारी द्यावी, अशी सूचना केली आहे. तरुण नेत्यांना उमेदवारी दिल्यास कार्यकर्त्यांमध्ये उर्जा निर्माण होणार आहे, असे पालेकर यांनी सांगितले.

सत्ताधारी भाजप पक्ष हा केवळ जिंकण्याची क्षमता पाहून उमेदवारी देत असतो. इंडिया आघाडीने तसे करू नये. जिंकण्याची क्षमता तर पहावीच पण त्याचबरोबर अन्य गोष्टींचाही विचार करावा आणि शक्यतो खूप वय झालेल्या नेत्यांपेक्षा उमेदवारी देताना युवा नेत्यांचा विचार करावा, अशी सूचना मित्र पक्ष या नात्याने आम्ही केली आहे, असे देखील अमित पालेकर यांनी
स्पष्ट केले.