काँग्रेस पक्षाने ‘जैत रथ’ प्रचार वाहने आणि मिस्ड कॉल मोहीम ‘हाथ देगा साथ, बदलेंगे हालात’ मोहिमेचा शुभारंभ येथील काँग्रेस मुख्यालयाजवळ काल केला. यावेळी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकोस्ता, उत्तर गोव्याचे उमेदवार ॲड. रमाकांत खलप, प्रसार माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर आदी नेते उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना पाटकर म्हणाले की, ज्या लोकांना काँग्रेसला पाठिंबा द्यायचा आहे ते 9821821898 या मोबाइल नंबरवर मिस्ड कॉल देऊ शकतात आणि त्यानंतर पक्षाचे सदस्य लोकांशी संपर्क साधतील. आमच्या दोन्ही उमेदवारांना निवडून देण्याचा निर्णय जनतेने घेतला
आहे.
ॲड. रमाकांत खलप आणि कॅ. विरियातो फर्नांडिस या दोन्ही उमेदवारांना लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या ‘न्याय गॅरंटी’ बद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी प्रचाराची वाहने सर्व विधानसभा मतदारसंघांत फिरतील. गोव्याला बेरोजगारी आणि महागाई या प्रमुख दोन समस्यांनी ग्रासले आहे आणि त्यामुळे बदल घडवून आणण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये खाणकाम पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. पण डबल इंजिन खाणकाम पुन्हा सुरू करण्यात आणि नोकऱ्या निर्माण करण्यात अपयशी ठरले आहेत, असा आरोप अमित पाटकर यांनी केला.
डबल इंजिन सरकार लोकांच्या बचत खात्यांमध्ये 15 लाख रुपये जमा करण्यात अपयशी ठरले आहे. भाजप सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले असून लोकांना त्याची जाणीव झाली आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षाने सुरू केलेल्या न्याय गॅरंटी बद्दल लोकांना माहिती देण्यासाठी ही प्रचार वाहने राज्यभर फिरतील, असे अमरनाथ पणजीकर यांनी सांगितले.