काँग्रेसच्या वचनबद्धतेमुळे भाजप नेते घाबरले आहेत

0
16

>> युरी आलेमाव यांचा तावडेंना टोला

काँग्रेस सत्तेवर आल्यास भारतीय राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीमध्ये सुधारणा करणार असून त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्याखाली पक्षांतर करणारे विधानसभा व संसदचे सदस्य तत्काळ अपात्र ठरणार आहेत. काँग्रेसच्या या वचनबद्धतेमुळे भाजप नेते विनोद तावडे घाबरले आहेत असा पलटवार विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे.

विरोधी पक्षनेते आलेमाव यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या काँग्रेस राज्यघटना बदलणार असल्याचा वक्तव्याचा निषेध केला. भाजप खोटी माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस वचनबद्ध आहे, असे युरी म्हणाले. ज्यांनी अनेक राज्यांत पक्षांतरे घडवून सत्ता हातात घेतली त्या भाजपनेच घटनेचा खून केला आहे. भाजपकडून आम्हांला संविधानाचे धडे नको आहेत. संविधानाचा अनादर करणारे भाजप नेतेच आहेत, असे युरी म्हणाले.

भाजपचे सरचिटणीस तावडे यांनी संविधानावर बोलताना दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा, मायकल लोबो, संकल्प आमोणकर व इतर चार पक्षबदलू आमदारांसह पत्रकार परिषदेला संबोधित करायला हवे होते, असा टोला युरी यांनी हाणला.
भाजपने गेल्या दहा वर्षांत पक्षांतरांना प्रोत्साहन देऊन लोकशाही पद्धतीने निवडून आलेली अनेक सरकारे उलथून टाकली आहेत. त्यांनी मडगाव नगरपालिकेत यापूर्वी दारुण पराभव झालेल्या नगराध्यक्षांना परत निवडून आणण्यासाठी नगरपालिकेच्या कायद्यात दुरुस्ती केली होती, असा आरोप आलेमाव यांनी केला.