>> आपचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी काँग्रेसला दाखवला आरसा
काँग्रेस पक्षाने उत्तर आणि दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील आपले उमेदवार जाहीर करण्यास विलंब लावल्याने प्रचारावर परिणाम होऊ लागला असल्याचे ‘इंडिया’ आघाडीचा एक घटक पक्ष असलेल्या आम आदमी पक्षाने म्हटले आहे.
आपचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी काल याविषयी चिंता व्यक्त करताना, काँग्रेसने उत्तर तसेच दक्षिण गोवा मतदारसंघासाठीचे उमेदवार जाहीर करण्यास उशिर केल्याने प्रचारावर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त केली.
‘इंडिया’ आघाडीसाठीच्या राज्यातील दोन्ही जागा ह्या काँग्रेसला मिळालेल्या असून, या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष, गोवा फॉरवर्ड, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे इंडिया आघाडीतील येथील घटक पक्ष काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचे पालेकर यांनी स्पष्ट केले. उमेदवार निवडीबाबतही आम्ही काँग्रेसला आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. त्यासाठी काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्याशी आपच्या नेत्यांनी चर्चा केली आहे, असे पालेकर म्हणाले. अन्य घटक पक्षांनीही त्याबाबत ठाकरे यांच्याशी चर्चा केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उमेदवार निवडीबाबत विविध घटक पक्षांनी केलेल्या सूचनांमुळे कदाचित उमेदवार निवडीस विलंब होत असावा, असेही ते म्हणाले.
इंडिया आघाडीला आमचा पाठिंबा असून, काँग्रेसच्या उमेदवारांना मते द्यायला हवीत असे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगण्यासाठी प्रचाराचे काम हाती घेतले असल्याचे पालेकर म्हणाले.