>> हरियाणा विधानसभा निवडणुकीत हेराफेरीचा केला होता आरोप; 1600 पानी उत्तर सादर
हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने केलेले हेराफेरीचे आरोप निवडणूक आयोगाने मंगळवारी फेटाळून लावले. निवडणूक आयोगाने आपल्या 1600 पानांच्या उत्तरात हे आरोप निराधार, खोटे आणि तथ्य नसलेले असल्याचे म्हटले आहे.
हरियाणा निवडणुकीत ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचा दावा करत काँग्रेसने 13 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. काँग्रेस नेते पवन खेडा यांनी 20 जागांच्या मतमोजणीदरम्यान ईव्हीएममध्ये अनियमितता आढळून आली असल्याचा आरोप केला होता.. या जागांसाठीच्या उमेदवारांनी लेखी व तोंडी तक्रारी केल्या होत्या. काँग्रेसने त्यांची यादी निवडणूक आयोगाकडे पाठवली आहे.
आयोगाने आपल्या उत्तरात म्हटले आहे की, मतदान आणि मतमोजणीसारख्या संवेदनशील काळात बेजबाबदार आरोप केल्याने अशांतता आणि अराजकता निर्माण होऊ शकते. गेल्या वर्षभरातील 5 प्रकरणांचा हवाला देत आयोगाने काँग्रेस पक्षाला आरोप करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आणि कोणत्याही पुराव्याशिवाय निवडणुकीच्या कामकाजावर हल्ला करणे टाळावे, असेही बजावले.
हरियाणात एकाच टप्प्यात 5 ऑक्टोबरला मतदान झाले आणि 8 ऑक्टोबरला निकाल लागला. मतमोजणीदरम्यान, काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती की काही ईव्हीएम 99 टक्के बॅटरी क्षमतेवर काम करत आहेत, तर काही 60-70 आणि 80 टक्क्यांपेक्षा कमी बॅटरी क्षमतेवर काम करत आहेत. ज्या जागांवर 99 टक्के बॅटरी चार्ज होती त्याच जागांवर काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले. त्याच वेळी, 60-70 टक्के बॅटरी चार्ज असलेली जी मशीन होती, त्या ठिकाणी काँग्रेस उमेदवार विजयी झाले. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत त्या मशीन सीलबंद आणि सुरक्षित ठेवाव्यात, अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेडा यांनी केली होती.
हरियाणा काँग्रेसनेही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती काँग्रेस नेते प्रिया मिश्रा आणि विकास बन्सल यांनी 16 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून 20 जागांवर झालेल्या मतदान आणि मतमोजणीत अनियमितता झाल्याचा आरोप केला होता. मात्र, 17 ऑक्टोबर रोजी न्यायालयाने ती याचिका फेटाळली होती.