गोवा प्रदेश काँग्रेस पक्षातर्फे बुधवार दि. 27 नोव्हेंबरपासून 60 दिवस राज्यभरात संविधान रक्षण अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानातून भाजपकडून होणारी संविधानाची पायमल्ली आणि दुरुपयोग लोकांसमोर मांडून जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पक्ष मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल दिली.
राज्य पातळीवरील या संविधान रक्षण अभियानाचा शुभारंभ बुधवारी संध्याकाळी 4 वाजता गोवा चेंबर ऑफ कॉमर्स सभागृहात करण्यात येणार आहे. यावेळी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. राज्यातील सर्व 40 मतदारसंघात मांद्रेपासून काणकोणपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करून संविधानाबाबत जनजागृती केली जाणार आहे, असेही पाटकर यांनी सांगितले.
या अभियानाच्या माध्यमातून समानता, आरक्षण, भेदभाव विरोध, आर्थिक न्याय आणि लोकशाही वाचवणे अशा 5 प्रमुख मुद्द्यांवर राज्य सरकारचे अपयश अधोरेखित केले जाणार आहे. राज्यातील संस्कृती, पर्यावरण नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याविरोधात होणारी नागरिकांची आंदोलने भाजप कुटनीतीचा वापर करून हाणून पाडत आहे, असा आरोप पाटकर यांनी केला.
भाजपची पक्षांतरविरोधी कायद्याबाबत स्पष्ट भूमिका नाही. भाजपने गोवा आणि देशात पक्षांतराला खतपाणी घातले आहे. लोकांनी जनादेश दिलेली इतर राजकीय पक्षांची सरकारे भाजपने पाडली आणि पक्षांतराच्या माध्यमातून आमदारांत फूट पाडून आपली सत्ता स्थापन केली, असेही पाटकर यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीनिवास खलप, विरेंद्र शिरोडकर यांची उपस्थिती होती.