काँग्रेसने गुरुवारी बंगळुरूत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. त्यात अमित शहा यांच्यावर प्रक्षोभक विधाने करणे, द्वेष पसरवणे व विरोधकांची प्रतिमा डागाळण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अमित शहा यांनी कर्नाटकातील एका सभेत राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास जातीय दंगली होतील, असे विधान केले होते. काँग्रेसने त्यांच्या याच विधानाप्रकरणी ही तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या प्रकरणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार दाखल केली आहे.
काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला, डॉ. परमेश्वरा व कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी बंगळुरू येथील हायग्राउंड पोलीस ठाण्यात अमित शहांविरोधात तक्रार दाखल केली. शहा यांच्या भाषणाचा व्हिडिओही तक्रारीसोबत जोडण्यात आला आहे.