लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध पक्ष वेगवेगळ्या घोषणा करत आहेत, आश्वासने देत आहेत. त्याच काल काँग्रेसने ‘नारी न्याय गॅरंटी’ योजनेची घोषणा केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी समाजमाध्यमांवरून या योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत काँग्रेसने गरीब महिलांना दरवर्षी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.
या योजनांची घोषणा करताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, महिलांसाठी योजनांची घोषणा करण्यापूर्वी आम्ही शेतकरी, कष्टकरी आणि युवकांसाठीच्या योजनांची घोषणा केली आहे. आमची गॅरंटी (हमी) म्हणजे पोकळ आश्वासने किंवा नुसती वक्तव्ये नाहीत, हे सांगण्याची गरज नाही. आमची आश्वासने म्हणजे काळ्या दगडावरची रेष आहे. आश्वासने पूर्ण करण्याचा आमचा विक्रम आहे. 1926 पासून आम्ही प्रत्येक वेळी दिलेली आश्वासने पूर्ण करत आलो आहोत. आमचे विरोधक जेव्हा जन्मालादेखील आले नव्हते, तेव्हा आम्ही जाहीरनामे बनवत होतो, असा टोलाही त्यांनी लगावला.
‘महालक्ष्मी गॅरंटी’ या योजनेंतर्गत गरीब कुटुंबांमधील महिलेला दरवर्षी 1 लाख रुपयांची मदत केली जाईल. ‘अर्धी लोकसंख्या-पूर्ण अधिकार’ या योजनेंतर्गत केंद्र सरकार शासकीय नियुक्त्यांमध्ये महिलांना अर्धा वाटा देईल. ‘शक्तीचा सन्मान’ या योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका, आशा सेविका, मध्यान्ह भोजन कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातील केंद्र सरकारचे योगदान दुप्पट केले जाईल. ‘अधिकार मैत्री’ या योजनेंतर्गत ग्रामपंचायतींमध्ये महिलांना त्यांच्या अधिकारांबाबत जागरुक करणे आणि त्यांना मदत करण्यासाठी एका कायदेविषयक सहाय्यकाची नियुक्ती केली जाईल. ‘सावित्रीबाई फुले वसतीगृह’ या योजनेंतर्गत सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी कमीत कमी एक वसतिगृह उभारले जाईल. संपूर्ण देशातील या वसतिगृहांची संख्या दुप्पट केली जाईल.