काँग्रेसकडून देशविभाजनाचा कट : पंतप्रधान

0
10

>> विरियातो फर्नांडिस यांच्या विधानाचा खरपूस समाचार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल छत्तीसगडमधील जांजगीर-चांपा येथे प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसचे दक्षिण गोव्यातील उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी भारतीय संविधान गोव्यावर जबरदस्तीने लादले, असे जे विधान सोमवारी केले होते, त्या विधानाचा यावेळी पंतप्रधानांनी खरपूस समाचार घेतला. काँग्रेसचा गोव्यातील एक उमेदवार म्हणतो की त्या राज्यात देशाचे संविधान लागू होत नाही. त्यांचे हे विधान म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि देशाच्या संविधानाचा अवमान आहे. हा देशविभाजनाचा कट असून, त्याला काँग्रेसच्या राजपुत्राची (राहुल गांधी) मूकसंमती आहे, अशी घणाघाती टीका नरेंद्र मोदींनी केली.

भारतीय राज्यघटना गोव्यातील जनतेवर लादली, असे वादग्रस्त वक्तव्य विरियातो फर्नांडिस यांनी दक्षिण गोव्यातील प्रचारसभेत दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्द्यावर बोलताना सोमवारी केले होते. त्यांच्या या विधानानंतर आता राष्ट्रीय पातळीवर राजकीय वातावरण तापले आहे. पंतप्रधानांसह भाजपच्या नेत्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

जांजगीर-चांपा येथील प्रचारसभेत पंतप्रधानांनी काँग्रेसवर चांगलाच हल्लाबोल केला. काँग्रेसने आता आणखी एक मोठा खेळ सुरू केला आहे. पहिल्यांदा कर्नाटकातील काँग्रेसचा एक खासदार म्हणाला की, आम्ही सत्तेत आल्यास दक्षिण भारताला वेगळा देश घोषित करणार आहोत. आणि आता काँग्रेसचा गोव्यातील एक उमेदवार म्हणतो की, गोव्यात भारताचे संविधान लागू होत नाही. गोव्यावर देशाचे संविधान जबरदस्तीने लादले आहे. आणि त्यांनी हा मुद्दा काँग्रेसच्या राजपुत्रासमोरही (राहुल गांधी) मांडला आहे. हा बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान नाही का, हा भारताच्या संविधानाचा अवमान नाही का, ही भारताच्या संविधानाशी छेडछाड नाही का, असा सवाल पंतप्रधानांनी या सभेत केला.

काँग्रेसचा उमेदवार म्हणतो की गोव्यात देशाचे संविधान चालणार नाही. जम्मू-काश्मीरचे लोक हेच म्हणत होते; परंतु आपला आशीर्वाद आम्हाला मिळाला आणि त्यांची बोलती बंद झाली आणि देशाचे संविधान जम्मू-काश्मीरमध्ये लागू झाले. काँग्रेसचा तो उमेदवार म्हणतो की त्याने ह्या सर्व गोष्टी काँग्रेसच्या राजपुत्राला सांगितल्या आहेत, याचा अर्थ त्यांची मूकसंमती आहे. हा देशविभाजनाचा कट आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

काँग्रेस उद्या संपूर्ण देशात संविधान नाकारेल : मोदी
काँग्रेसला देशाच्या एका मोठ्या वर्गाने नाकारले आहे. त्यामुळे ते देशाचे वेगवेगळे स्वतंत्र विभाग बनवू पाहत आहेत. आज काँग्रेस गोव्यात संविधानाला नाकारत आहे. उद्या संपूर्ण देशात आंबेडकरांचे संविधान नाकारेल, अशी भीती देखील पंतप्रधानांनी व्यक्त केली.

वक्तव्याचा सोयीस्कर अर्थ लावू नका : फर्नांडिस
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राजकीय फायदा मिळवण्यासाठी आणि विष पसरवण्यासाठी आपल्या भाषणातील निवडक शब्द फिरवण्याचा प्रयत्न करू नये. मी जे वक्तव्य केले, त्यावर खुल्या चर्चेसाठी तयार आहे. माझ्या वक्तव्याचा सोयीस्कर अर्थ लावून राजकीय पोळी भाजू नये, अशी प्रतिक्रिया विरियातो फर्नांडिस यांनी काल दिली.

विरियातोंविरोधात भाजपची आयोगाकडे तक्रार

>> संविधान अवमान प्रकरणी निवडणूक लढवण्यापासून अपात्र ठरवण्याची मागणी

गोव्यावर देशाची राज्यघटना लादण्यात आली, या काँग्रेसचे दक्षिण गोव्यातील उमेदवार कॅप्टन विरियतो फर्नांडिस यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले असून, भाजपने गोव्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे (सीईओ) विरियातो फर्नांडिस यांच्याविरोधात संविधानाच्या अवमान प्रकरणी काल तक्रार दाखल केली.

भाजपने मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांच्याकडे विरियातो फर्नांडिस यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात तक्रार दाखल केली. संविधानाच्या विरोधात वक्तव्य करून फर्नांडिस हे समाजात विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा विषय भारतीय निवडणूक आयोगाकडे पाठवून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

देशात निवडून आलेला प्रत्येक लोकप्रतिनिधी गोपनीयतेची शपथ घेताना आपण भारताच्या संविधानाशी बांधील असल्याची ग्वाही देत असतो; मात्र विरियातो फर्नांडिस यांनी 1961 साली गोव्यावर भारताचे संविधान लादण्यात आल्याचे धक्कादायक आणि निषेधार्ह वक्तव्य आपल्या प्रचारादरम्यान केले. या वक्तव्याने भारतीय संविधानाचा अनादर झाला आहे. निवडणूक आयोगाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि त्यांना निवडणूक लढवण्यापासून अपात्र घोषित केले पाहिजे, अशी मागणी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केली. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस दामू नाईक, माजी आमदार ग्लेन टिकलो, माजी मंत्री दिलीप परुळेकर उपस्थित होते.

गोव्यात भारतीय संविधान लागू झाले तेव्हा देशाचे पंतप्रधान कोण होते, असा प्रश्न उपस्थित करण्याबरोबरच विरियातो फर्नांडिस यांच्या वक्तव्याशी काँग्रेस पक्ष सहमत आहे का, याचा खुलासा पक्षाने केला पाहिजे, असे दिगंबर कामत म्हणाले. तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय संविधान लागू केले ते योग्य होते की अयोग्य आणि काँग्रेसची याविषयीची भूमिका काय आहे, हेही स्पष्ट करण्याची गरज आहे, अशी मागणी कामत यांनी केली.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात संविधानाचा आदर करणार असल्याचे छापले आहे; पण खुद्द काँग्रेसचे उमेदवार संविधानाचा अनादर करत आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वयंपूर्ण गोवाच्या माध्यमातून पुढे नेलेले मुद्दे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आहेत. काँग्रेसचा जाहीरनामा बोगस, दिशाभूल करणारा आणि गोमंतकीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे, असा आरोप दामू नाईक यांनी केला.

नोटीस आल्यानंतर उत्तर देऊ : कार्लूस फेरेरा
विरियातो फर्नांडिस याच्या प्रचारसभेतील वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. त्यांना निवडणूक आयोगाकडून या प्रकरणी नोटीस आल्यानंतर आम्ही योग्य उत्तर देऊ, असे कॉँग्रेसचे आमदार ॲड. कार्लूस फेरेरा यांनी काल सांगितले.